चिंचवली रस्त्यावर केंट जेनियस स्कूलच्या बसला अपघात !
खड्डे, खडी आणि खराब रस्त्यामुळे अपघात; प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
चिंचवली :- प्रतिनिधी चिंचवली रस्त्यावर केंट जेनियस स्कूलजवळ आज सकाळी शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्याची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पसरलेली खडी यामुळे बस घसरून नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कारभाराबाबत पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिंचवली रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी खडी पसरलेली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी केंट जेनियस स्कूलची बस खराब रस्त्यावरून जात असताना दगड आणि खडीवरून घसरली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
प्रशासनाला नागरिकांचे सवाल महत्त्वाचा आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेला हा रस्ता अद्याप दुरुस्त का करण्यात आला नाही? रस्त्याच्या कामांसाठी निधी आणि निविदा प्रक्रिया होत असताना प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अशीच का आहे? एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
विकास केवळ कागदावर? रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असताना विकासकामांचा दावा मात्र कागदावरच होत असल्याची टीका स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या अपघाताची तात्काळ चौकशी करून चिंचवली रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.