पशुधनाला मिळणार विमा संरक्षण
पशुपालकांना ८५ टक्के शासकीय अनुदानाचा लाभ; राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना
ठाणे:- राज्यातील पशुपालकांच्या पशुधनाला आजार,अपघात,विषबाधा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूपासून आर्थिक संरक्षण मिळावे,या उद्देशाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पशुधनाच्या अनपेक्षित मृत्यूमुळे पशुपालकांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात पशुधन विमा योजना राबविण्यात येत असून पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. ज्योती परदेशी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० या प्रमाणात उचलण्यात येतो. त्यामुळे लाभार्थी पशुपालकाला केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त १० जनावरांसाठी या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. पशुपालकांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या दिलासादायक असून, पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योजनेनुसार दुभत्या गायी व बैलांसाठी कमाल ९० हजार रुपये,दुभत्या म्हशी व रेड्यांसाठी कमाल ८० हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी कमाल ७ हजार रुपये प्रति जनावर विमा संरक्षणाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विमा संरक्षणासाठी भारत पशुधन प्रणालीवर १२ अंकी कानटॅगसह जनावराची नोंदणी बंधनकारक आहे. “नो टॅग,नो क्लेम” या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. ९० हजार रुपये विमा मूल्य असलेल्या संकरित गायीच्या एका वर्षाच्या विम्यासाठी एकूण ३,०९० रुपये विमा हप्ता आकारला जातो. त्यापैकी पशुपालकाचा १५ टक्के हिस्सा ४६३.५० रुपये राहतो. दोन वर्षांसाठी ८७८.४० रुपये,तर तीन वर्षांच्या कालावधीसाठी १,१०२.४० रुपये पशुपालकाचा हिस्सा राहणार आहे. जनावराचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत नोंदणी करून विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट पशुपालकाच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया आहे. मुदतीत विमा दावा न केल्यास कंपनीकडून १२ टक्के दराने व्याज आकारले जाऊ शकते. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबविण्यात येणारी ही योजना पशुपालकांसाठी आर्थिक सुरक्षा कवच ठरणार असून,ठाणे जिल्ह्यातील पशुपालकांनी संबंधित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून आपल्या पशुधनाचा विमा करून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.