ठाणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रम
'ग्रामीण ते अवकाश’ची झेप; ठाण्यातील ५९ विद्यार्थ्यांची ISRO कडे भरारी!
ठाणे:- ठाणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या उपक्रमांतर्गत ‘ग्रामीण ते अवकाश’ हा महत्त्वाकांक्षी व्हिजन आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ५९ विद्यार्थ्यांना ISRO ला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. आज या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्ह्यातील तब्बल ९५०० विद्यार्थ्यांमधून ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ‘मिशन भरारी’ अंतर्गत इयत्ता ५ वी ते ८ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे,निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ५४ मराठी माध्यमातील तर ५ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.या उपक्रमासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून,विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये,अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार किसन कथोरे,आमदार निरंजन डावखरे,आमदार राजेश मोरे,आमदार शांताराम मोरे,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,नगरसेवक विकास रेपाळे,ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी संदीप माने तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.