पी एम पी बस कंडक्टरची कर्तव्यतत्परता
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- बसमधून उतरताना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून पळून जाणा-या चोरट्याला पी एम पी बस कंडक्टरने डिव्हायडरवरून उडी मारून पकडून कर्तव्यतत्परतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.
शिरूर तालुक्यातील आनंदनगर, सणसवाडी येथील रेणू हाडू साहू या ५६ वर्षीय महिला सणसवाडी येथून पी एम पी बसने पुण्याला गेल्या होत्या. त्या पुणे महानगरपालिका बसस्थानकात उतरत असताना त्यांच्या हातामध्ये पिशवी होती. मदत करतो असे म्हणत एकाने त्यांची पिशवी असलेला हात धरला.
त्यावेळी बस कंडक्टर तुम्ही उतरत का नाही? तुम्ही का थांबलात ? त्यावर रेणू साहू म्हणाल्या,या माणसाने माझी पिशवी पकडून ठेवली आहे. त्यानंतर ती व्यक्ती पिशवी सोडून पळून जावू लागला. त्यावेळी रेणू साहू या महिलेने त्यांच्या उजव्या हाताकडे बघितल्यानंतर हातातील सोन्याची बांगडी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बस कंडक्टरने एका बाजूने रस्त्यामधील डिव्हायडरवर उडी मारून पळून जाणा-या चोरट्याला पकडले. पोलीसांना फोन करून बोलावून चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात दिले.
लखन सुहास जाधव वय- ३० सर्वोदय काॅलनी,मुंढवा असे पकडण्यात आलेल्या चोरट्यांचे नाव असून हवालदार दीपक रोमाडे तपास करत आहेत.चाॅंद शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिका पी एम पी बसस्थानक परिसरात घडली.