मतदान पर्यवेक्षक वसीम फरहत यांचा दिल्लीत सन्मान
अमरावती :- बडनेरा 37 विधानसभा मतदारसंघ भातकुली तहसील येथे कार्यरत मतदान पर्यवेक्षक अधिकारी वसीम फरहत यांचा राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात नवी दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था येथे सन्मान करण्यात आला.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १२ व १३ जून रोजी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्लीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात जिल्हाधिकारी,उप जिल्हाधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार,पर्यवेक्षक आणि बीएलओ अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून एकूण १३२ अधिकारी या प्रशिक्षणात उपस्थित होते. या प्रशिक्षणात अमरावती जिल्ह्यातील बडनेरा 37 विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना,वसीम फरहत यांनी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावीपणे राबवण्याबाबत केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांना अद्यावत राहणे नितांत गरजेचे आहे,असे मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे ही उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दुल यांच्या हस्ते वसीम फरहत यांचा गौरव करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विवेक जोशी,निवडणूक आयुक्त,भारत निवडणूक आयोग हे उपस्थित होते. वसीम फरहत यांनी आपले यशाचे श्रेय उपजिल्हाधिकारी जाधव,जिल्हा उप निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे,भातकुलीचे तहसीलदार डॉ.अजित कुमार येले,नायब तहसीलदार वाढोणकर व अशोककुमार कळीवकर यांना दिले.तसेच उर्दू शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अमरावतीच्या पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
====================