विद्यूतरोहित्र चोरणा-या टोळीला शिरूर पोलिसांकडून अटक
शिक्रापूर :- विद्यूतरोहित्र चोरणा-या पाच आरोपींपैकी तिघा आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून शिरूर पोलीसांनी सुमारे अडीच लाख रूपये किंमतीच्या विद्यूतरोहित्रांमधील ३१५ किलो वजन असलेल्या तांब्याच्या काॅईल तसेच चोरी करण्यासाठी ३ लाख रुपये किंमतीची चारचाकी असा एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.लवकुशकुमार उर्फ लवकुशराम प्रसाद गौतम वय-२२,मोहम्मद फरानखान उर्फ साहिल महंमद अस्लम खान वय-२१ मुजाहिर शौकत अलिखान वय-२२ अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
४ जुलैला रात्रीच्या वेळी शिरूर तालुक्यातील आंबळे परिसरातील रानमळा येथील गट नंबर ५७९ मधील खांबावर असलेले विद्यूतरोहित्र वीजपुरवठा बंद करून चोरट्यांनी जमिनीवर खाली घेवून त्यातील २५ हजार रूपये किंमतीच्या ५० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या.याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानूसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.