राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना,
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई:-बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. याचं कारण आहे हवेच्या कमी दाबाची रेषा आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थिती. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 दिवस उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये 15 एप्रिलपासून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढीचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होईल आणि त्यानंतर तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोल्यात देशात सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पश्चिमी विक्षोप म्हणजे हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतामुळे संपूर्ण उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतात पाऊस, गारपीट होत आहे. त्याचा राज्यावर काहीही परिणाम होत नाही.
उन्हाच्या चटक्यामुळे फळे, भाजीपाल्याची होरपळ, कलिंगड, पपई, केळीला फटका; पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो. राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान सरासरी 35 ते 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे कलिंगड, पपई, स्ट्रॉबेरी, केळी होरपळ होत आहे. टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. एकीकडे उन्हाचा चटका बसत असतानाच दुसरीकडे पपई, टोमॅटो आणि कलिंगडाला अवघा पाच ते आठ रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी होरपळ होत आहे.