दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू
दौंड तालुक्यातील पिलानवाडी, शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे अपघात
शिक्रापूर:- दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील पिलानवाडी तसेच शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ घडली.
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली -पारगाव रस्त्यावरील दौंड तालुक्यातील पिलानवाडी ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी दि.२४ डिसेंबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
निलेश मारूती चव्हाण वय २७ वर्षे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव असून हा अपघात कदम पाटील पेट्रोलपंपाजवळ झाला. या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार, निलेश चव्हाण हा युवक खुटबाव येथील कंपनीत कार्यरत होता.कंपनीच्या कामानिमित्त तो मंगळवारी २३ डिसेंबरला बाहेरगावी गेला होता.दुचाकीवरून वाघोली -पारगावमार्गे पिंपळगावकडे परतत असताना कदम पाटील पेट्रोल पंपाजवळ ऊस वाहतूक करणा-या टायर बैलगाडीला ओव्हरटेक करून पुढे गेल्यानंतर भरधाव वेगातील अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिल्याने निलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.अपघातानंतर निलेशला नागरिकांनी तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सौरभ मंडले यांनी अपघाताची फिर्याद यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली असून यवत पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान,कंपनीत काम करत असताना पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते.मागील तीन वर्षांपासून पोलीस भरतीचा सराव तो करत होता असेही समजले.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा जवळील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ झालेल्या दुस-या अपघातात अज्ञात टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने उबेद सलमान शेख या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,दुचाकीस्वार युवक वाडा पुनर्वसन फाट्याजवळील स्पीड ब्रेकर जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात चार चाकी टेम्पोने एम एच १५ इ एल ८६८८ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात उबेद सलमान शेख यांचा जागीच मृत्यू झाला.दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे असे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार गुपचे,पोलीस काॅन्स्टेबल विलास सरोदे,सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे,गोरक्ष घावटे घटनास्थळी तातडीने दाखल झाले.