• Total Visitor ( 394899 )
News photo

ठाण्यात 'शिवशंभू गाथा' कार्यक्रमाचे आयोजन

Raju tapal February 17, 2026 7

विद्यार्थ्यांनो, शिवरायांचा देदिप्यमान इतिहास अनुभवायला सज्ज व्हा..



ठाण्यात 'शिवशंभू गाथा' कार्यक्रमाचे आयोजन



ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

'शिवशंभू गाथा' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास उलगडला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत 'राम गणेश गडकरी रंगायतन', ठाणे येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपल्या कलेतून इतिहास जिवंत करणार आहेत. यामध्ये 'कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा' महाविजेता वैभव थोरात, 'सोनी टीव्ही मराठी इंडियन आयडॉल' विजेता सागर म्हात्रे आणि रोहित पाटील यांसारखे दिग्गज गायक आपली कला सादर करतील. तसेच सुप्रसिद्ध गायिका मैथिली भगत, पूजा म्हात्रे आणि कथावाचक कल्पेश डुकले यांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना स्वराज्याचा पराक्रम जवळून अनुभवता येईल.

ऐतिहासिक गाणी, पोवाडे, कथावाचन आणि नृत्याविष्काराने सजलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची आणि अभिमानाची मोठी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथेही शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पिढीला आपल्या वैभवशाली संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रूपाली भालके आणि तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement