अमरावती जिल्ह्यातील ११० शिक्षकांची ‘आयडॉल टीचर’ म्हणून निवड...
विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता संपादणुकीत उत्कृष्ट कामगिरी,राज्यातील ४ हजार ४८४ शिक्षकांचा समावेश...
अमरावती :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT),पुणे यांच्यावतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४ हजार ४८४ शिक्षकांची ‘आयडॉल टीचर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तब्बल ११० शिक्षकांचा समावेश असून, जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.राज्य शासनाने १६ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘आयडॉल टीचर’ ही संकल्पना सुरू केली. त्यानंतर ११ जुलै २०२५ रोजी निवडीसाठीचे निकष निश्चित करण्यात आले. अत्यंत काटेकोर निकषांच्या आधारे ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.आयडॉल टीचर निवडीचा सर्वांत महत्त्वाचा निकष म्हणजे संबंधित शिक्षकाच्या वर्गातील किमान ९० टक्के विद्यार्थ्यांनी सर्व मूलभूत क्षमता १०० टक्के संपादित केलेल्या असणे हा आहे. या निकषांची सखोल तपासणी केल्यानंतर SCERT ने राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३७६ तालुक्यातील २ हजार ८०७ समूह साधन केंद्रांमधून निवड झालेल्या ४ हजार ४८४ शिक्षकांची २०६ पानी यादी प्रसिद्ध केली आहे.
आयडॉल शिक्षकांवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीची जबाबदारी :- निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांना राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.त्यामध्ये दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी अन्य शिक्षकांना मार्गदर्शन करणे,राज्य,विभाग व विविध स्तरांवर मास्टर ट्रेनर म्हणून काम करणे,तसेच शिक्षक प्रशिक्षण,शिक्षण परिषदा आणि कार्यशाळांमध्ये आपल्या अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन करणे या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.उत्कृष्ट अध्यापन पद्धती आणि प्रभावी शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून इतर शिक्षकांना प्रेरित करून राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आयडॉल शिक्षकांच्या माध्यमातून केले जाणार आहे.अमरावती जिल्ह्यातील ११० शिक्षकांची या प्रतिष्ठेच्या उपक्रमासाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,शिक्षक नेते उदय शिंदे,जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार,जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी सर्व निवड झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.