इस्रायलच्या एकामागोमाग एक हल्ल्यांनी इराणची राजधानी तेहरान हादरली;
नागरिक भयभीत;संघर्ष तीव्र
जेरूसलेम :- इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला केला असून इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलने एकामागून एक केलेल्या हवाई हल्ल्यांनी राजधानीचे अनेक भाग हादरवून टाकले. इस्रायलने गुप्तचर मंत्रालय,पोलीस मुख्यालय आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, तेहरान-उत्तर,तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण स्पष्ट दिसत होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार,खाजे अब्दुल्ला स्ट्रीटवरील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या इमारतीवर इस्रायली क्षेपणास्त्रे डागण्यात आली. 'दिदबान इराण' या वृत्तसंस्थेने पोलीस मुख्यालयाजवळ मोठा स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच,'इराण इंटरनॅशनल'ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये,निरू हवाई क्षेत्रातील अनेक इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. या हल्ल्यांमध्ये किती जीवितहानी झाली आणि किती मालमत्तेचे नुकसान झाले,याची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही.
इस्रायली माध्यमांनुसार, तेहरानमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करण्यात आला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,हा हल्ला नुकताच झाला आहे आणि त्यांनी इराणी सर्वोच्च नेते खामेनी यांना हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. दुसरीकडे,इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या प्रकरणात अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की,अमेरिकेच्या परवानगीशिवाय इस्रायल हे सर्व करू शकत नाही. इराणला युद्ध नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,परंतु जर हल्ले सुरूच राहिले,तर इराणचे सैन्य आणखी ताकदीने प्रत्युत्तर देतील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेच्या संगनमतामुळे इराणला कठोर प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले जात असल्याचेही ते म्हणाले. इराणच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे विधान करण्यात आले. इस्रायली हवाई दलाने रविवारी जॉर्डन खोऱ्यात एक इराणी ड्रोन पाडल्याची माहिती दिली. दिवसभरात इराणने डझनभर ड्रोन सोडले होते,त्यापैकी बहुतेक ड्रोन इस्रायली संरक्षण यंत्रणेने वेळेत हवेतच नष्ट केले. यावरून हे स्पष्ट होते की,दोन्ही देशांमधील संघर्ष थांबलेला नाही,तर तो अधिक तीव्र होत आहे.