कल्याणमध्ये तरुणाने एका तरुणीला केली अमानुष मारहाण;
लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
मनसे आक्रमक झाली असून,आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी
कल्याण :- कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या तरुणीला तरुणाने अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुणाने किती अमानुषपणे रिस्पेशनिस्ट तरुणीला मारहाण केली आहे ते स्पष्ट दिसत आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. मारहाण करणारा तरुण हा परप्रांतीय आहे. त्याने पीडित तरुणीला आधी शिवीगाळ केली. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना पीडितेला ढसाढसा रडू कोसळलं. पीडितेने एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी तिने आपबिती सांगितली. या घटना प्रकरणातील आरोपीला अटक करुन कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
त्या व्यक्तीने मला शिवीगाळ केली. मी फक्त एवढंच बोलली की, सर तुमचा नंबर नाही. नंबर येण्यास अजून वेळ आहे. नंबर आली की मी तुम्हाला आतमध्ये पाठवेन. यात माझी काय चूक आहे? माझी काही चूक नसताना त्याने मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मला प्रचंड अमानुष मारहाण केली. माझे केस ओढून मला बाहेर दरवाजापर्यंत नेलं. मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या पायाचे निशाणा माझ्या टीशर्टवर आहे. आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात त्याची तक्रार केली आहे, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीने वृत्तवाहिनीला दिली आहे.
पीडितेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आपल्यासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. यावेळी तिला प्रतिक्रिया देत असताना रडू कोसळलं. मी रिस्पेशनिस्ट म्हणून जॉबला आहे. साडेसहाच्या सुमारास डॉक्टर क्लिनिकला आले नव्हते. पाच-दहा मिनिटांनी सर आले. तेव्हा पेशंटचा नंबरही नव्हता. मी एका पेशंटला पाठवलं ज्यांचा नंबर होता, असं पीडिता म्हणाली. सरांनी मला पेशंटला अडवायला सांगितलं, तर मी त्या पेशंटला फक्त एवढंच बोलले की, दादा तुमचा नंबर नाही. तर त्यावर त्या व्यक्तीने मला अर्वाच्य शिवीगाळ केली.त्यानंतर पेशंटसोबत जी व्यक्ती आली होती त्यांनाही सांगितलं की, संबंधित व्यक्ती कशाप्रकारे शिवीगाळ करत आहे. त्यात माजी चूक काय? त्याने माझी चूक नसताना छातीत दोन-तीन लाथा मारल्या. मी खिडकीला जाऊन आपटली. त्यानंतर त्याने माझे केस ओढत दरवाजापर्यंत ओढत घसघसत नेलं, तिथे सु्द्धा मारहाण केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा केली आहे. घटना अतिशय गंभीर आहे. एका महिलेला मारहाण करणं हे योग्य नाही. महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्या व्यक्तीवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल. आरोपीचा शोध सुरु आहे. असे ते म्हणाले.