दिल्ली विमानतळावर लँड होताच एअर इंडियाच्या विमानाला लागली आग;
प्रवासी उतरत असतानाच विमानाने घेतला पेट;
प्रवाशांमध्ये घबराट
नवी दिल्ली :- गेल्या महिन्याभरापासून एअर इंडिया सातत्यानं चर्चेत आहेत. एअर इंडियाच्या सेवेचा फटका प्रवाशांना सातत्यानं बसत आहे. काल एअर इंडियाचं विमान मुंबईत धावपट्टीवरुन घसरलं. विमानाचे तीन टायर फुटले. ही घटना ताजी असताना आता हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या एआय ३१५ विमानाला आग लागल्याची घटना घडली. दिल्ली विमानतळावर एअर इंडियाचं विमान उतरल्यानंतर हा प्रकार घडला. प्रवासी विमानातून उतरत असताना ही घटना घडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रवासी प्रचंड घाबरले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट एआय ३१५ मध्ये लँडिंग आणि गेटवर पार्क झाल्यानंतर लगेचच आग लागली. सहायक पॉवर युनिटमध्ये आग लागली होती. त्यावेळी प्रवासी विमानातून खाली उतरत होते. सिस्टिम डिझाईननुसार एपीयू ऑटोमॅटिक शटडाऊन झालं. त्यामुळे स्थिती लगेचच नियंत्रणात आली. या घटनेमुळे विमानाचं थोडं नुकसान झालं. पण प्रवासी आणि पायलट यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
विमानाला तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून संबंधित नियामक प्राधिकरणाला याची माहिती देण्यात आल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडियाची विमानं त्यात होणाऱ्या बिघाडांमुळे चर्चेत आहेत. विमानांमधील त्रुटी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता दिल्ली विमानतळावर लँड होताच विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे.