• Total Visitor ( 712078 )
News photo

डिंभे उजवा कालव्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

Raju Tapal publisher October 04, 2026 32

डिंभे उजवा कालव्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

     

 भूसंपादनाचा मोबदला व रखडलेले भरावाचे काम पूर्ण करण्याची अ‍ॅड.धर्मेंद्र खांडरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी

    

पुणे (प्रतिनिधी ):- कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे उजवा कालव्याची शिरूर तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.धर्मेंद्र खांडरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले असल्याचे खांडरे यांनी सांगितले. डिंभे उजवा कालवा आंबेगाव तालुक्यातून व शिरूर तालुक्यातील सविंदणे,कवठे येमाई,आमदाबाद,निमगाव भोगी,ढोकसांगवी,आण्णापूर,कर्डेलवाडी,सरदवाडी,बो-हाडे मळा,थापेवाडी मार्गे गोलेगावपर्यंत सुमारे ११६ कि.मी. लांबीचा आहे. या कालव्याचे काम सन २००८-०९ मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र,अद्याप काही कामे अपूर्ण आहेत. कर्डेलवाडी येथील कि.मी. १०५ ते १०६ मधील भरावाचे काम तसेच सरदवाडी येथील सुमारे ४०० मीटर भरावाचे काम अपूर्ण असून, सरदवाडीच्या कामाची निविदाही अद्याप काढण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच सरदवाडी परिसरातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे खांडरे यांनी म्हटले आहे. बो-हाडे मळा,थापेवाडी,तर्डोबाचीवाडी व गोलेगाव हद्दीतील शेतकऱ्यांनाही भूसंपादनाच्या मोबदल्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कुकडी प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल मंजूर करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत,शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तातडीने द्यावा आणि यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य नुकसानीची परिस्थिती लक्षात घेऊन प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी अ‍ॅड. धर्मेंद्र खांडरे यांनी केली आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वेळोवेळी अथक  प्रयत्न केल्याचे सांगून हे काम मार्गी लागल्यावर शिरूर पंचक्रोशीतील अडीच हजार हून अधिक एकर जमिनीस त्याचा फायदा होण्या बरोबरच पिण्याचा पाणी प्रश्न ही मार्गी लागणार असल्याचे खांडरे यांनी सांगितले.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement