विनोबा शिक्षण उत्सवात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव
जिल्ह्यातील ७० शिक्षक,२३ केंद्रप्रमुखांसह शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान
अमरावती:- शिक्षण क्षेत्रात समर्पितपणे कार्य करून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक,केंद्रप्रमुख,गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘विनोबा शिक्षण उत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. ९ सप्टेंबर रोजी अमरावती येथील तेलाई सेलिब्रेशन हॉल,शेगाव–रहाटगाव रोड,अर्जुन नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या उत्सवात जिल्ह्यातील ७० शिक्षक,२३ केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एकूण ९३ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था,अमरावतीचे वरिष्ठ अधिव्याख्याता पवन मानकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर,अमरावती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्वेता गोळे, दर्यापूरचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार जाधव,भातकुलीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे,अंजनगाव सुर्जीच्या गटशिक्षणाधिकारी शीला आठवले,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रशेखर रामटेके,सुनील खडे तसेच चांदूर रेल्वे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी किरण पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत ५३ टक्के वाढ
पुरस्कार वितरण कार्यक्रमात अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (IAS) यांनी विनोबा उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या शैक्षणिक बदलांचा उल्लेख केला. ते म्हणाले,“विनोबा उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शैक्षणिक हस्तक्षेपांमुळे २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत सुमारे ५३ टक्के वाढ झाली आहे. आता केवळ वाचनावर नव्हे, तर विद्यार्थ्यांना वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजणे आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करणे यावर शिक्षकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे.”
पॅनल डिस्कशनमधून शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा
उत्सवात शैक्षणिक गुणवत्ता,अध्ययन निष्पत्ती आणि विनोबा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर आधारित पॅनल डिस्कशन आयोजित करण्यात आले. विनोबा विभागाचे व्यवस्थापक अमोल कुकडे यांनी पॅनलचे नेतृत्व केले.या चर्चेत वरूडचे गटशिक्षणाधिकारी विनोद गाडे,नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ,मोर्शी व तिवसाचे गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे,तिवसा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रशेखर रामटेके,शिक्षिका डॉ.सुनीता लहाने आणि शिक्षक अंकुश गावंडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला संदीप बोडखे,गटशिक्षणाधिकारी,२३ केंद्रप्रमुख,७० शिक्षक,तसेच विनोबा टीमचे अधिकारी व व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी विनोबा टीमचे विभागीय व्यवस्थापक अमोल कुकडे,कार्यक्रम व्यवस्थापक रघुनाथ वानखेडे,वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी सागर गजभिये,जीवनकौशल्य व्यवस्थापक नेहा उपासनी यांच्यासह विनोबा टीमचे १६ व्यवस्थापक व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा उपासनी व अब्दुल शहजाद यांनी केले. प्रास्ताविक रघुनाथ वानखेडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सागर गजभिये यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.