• Total Visitor ( 428038 )
News photo

नगरमध्ये खतरनाक ‘हनिट्रॅप’ ‘त्या’ दोघींसह टोळीच पकडली

Raju tapal February 02, 2026 112

नगरमध्ये खतरनाक ‘हनिट्रॅप’ ‘त्या’ दोघींसह टोळीच पकडली



नगर तालुका पोलिस ठाण्यात,24 जानेवारीला एक फिर्याद दाखल झाली. नगरजवळ असलेल्या बारदरी येथे एका युवकाला लुटण्यात आलं होतं. हा तरुण गर्भगीरी फाटा येथे लघुशंकेसाठी थांबला. तेव्हा मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी त्याला रिंगण घातलं. त्यापैकी एकानं फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावला. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोन्या-चांदीच्या चेन,खिशातील पैसे,मोबाईल काढून घेण्यात आला. त्यानंतर हे तिघेही लुटारु पुन्हा त्यांच्या मोटारसायकलवर पसार झाले. आता हा गुन्हा साधा दिसत असला तरी,तो गंभीर स्वरुपाचा नक्कीच होता. अगदी नगरच्या जवळ,रस्तालूट झाल्याने पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले. साधारणः 25 जानेवारीपासून हा तपास सुरु झाला. पोलिस पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. आसपासच्या लोकांकडून व विक्रेत्यांकडून काही माहिती घेतली. त्यानंतर काही तांत्रिक तपास सुरु केला. या सगळ्या तपासानंतर पोलिसांना त्यातील एकाचा ट्रेस लागला. संशयीत म्हणून,एकाच गुन्हेगाराच्या नावापर्यंत पोलिस पोहोचले. परंतु ज्याचं नाव समोर येत होतं,तो मात्र सध्या गोव्याला असल्याचं तांत्रिक तपासात पुढं आलं. आता त्याला गोव्यावरुन येईपर्यंत पोलस थांबले. आता हा संशयित,तपोवन रोड येथे येणार असल्याची पक्की टीप एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी व्यवस्थित सापळा लावला. संशयीत आला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. त्याचं नाव होतं,शुभम बडे. तो वाणीनगर येथे राहत होता. शुभम बडेची कुंडली पोलिसांनी शोधली. तर तो सराईत निघाला. तोफखाना पोलिसांत त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानंतर पोलिसांनी बारदरी घटनेची उकल,त्याच्याकडून करुन घेतली. त्याने 24 जानेवारीची रस्तालूट आपण इतर दोन साथिदारांच्या मदतीने केल्याची कबूली दिली. आता या तपासात,एक-एक ट्विस्ट येऊ लागला. शुभम बडेच्या कबुली जबाबावरुन पोलिसांनी शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील सोहेल पापाभाई सय्यद व भिंगार येथील अशपाक नासिर पठाण या दोघांनाही उचललं. आता या सगळ्यांच्या जबाबात दोन तरुणींची नावे पुढे आली. त्यातील एक होती भगवानबाबा चौक येथे राहणारी वैष्णवी राजेंद्र उनवणे व दुसरी होती, एमआयडीसी परिसरात राहणारी रुपाली गजानन बनकर पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर हे प्रकरण हनीट्रॅप करुन झाल्याचं समोर आलं. तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं,त्याला एकांतात बोलवायचं आणि नंतर लुटायचं,असं सगळं हे प्रकरण असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. आता 24 जानेवारीची एकच घटना झाल्यावर ही टोळी पकडली असली तरी,या टोळीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून यापूर्वीही पाच ते सहा जणांना लुटल्याची शंका,नगर पोलिसांना आहे. पोलिसांनी या टोळीबाबत काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही केलंय. इज्जतीचा पंचनामा नको,म्हणून अनेक तरुण लुटल्यानंतर फिर्याद दाखल करत नाहीत. त्यामुळे अशा टोळ्या सोकावतात,असं पोलिसांच म्हणणं आहे. या टोळीनं 24 जानेवारीचा गुन्हा करुन तब्बल 2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. शिवाय या दोघी,केडगावातील ज्या सोनाराकडं लुटीतील सोनं विकायच्या,त्या सूरज शहाणे या सराफालाही ताब्यात घेतलंय. सुरज शहाणे या सराफाकडून पोलिसांनी मुद्देमालही जप्त केलाय. लुटमार करुन,ही टोळी गोव्याला फिरायला गेली होती. सोने विकून त्या पैशावर गोवा बीचवर या टोळीने मौजमजा केली. हे प्रकार वारंवार घडत होते,असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु आत्तापर्यंत फक्त एकच फिर्याद समोर आलीय. हनीट्रॅपमध्ये तरुणांना सहजासहजी अडकवून,त्यांना लुटण्याचे प्रकार सध्या नगरमध्ये वाढले आहेत. त्यामुळे सजग होणं महत्त्वाचं आहे,असंही आवाहन पोलिसांनी केलंय.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement