डॅा.ज्योती ठाकरे सल्लागार समितीवर
कोकण मराठी साहित्य परिषद या राज्यातल्या अग्रगण्य व प्रतिष्ठित साहित्य संस्थेच्या सल्लागार समितीवर शिवसेनेच्या उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॅा.ज्योती ठाकरे यांची निवड झाली आहे.कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.सदर त्रिसदस्यीय सल्लागार समितीत महाडच्या शोभाताई सावंत व पनवेलचे रामशेठ ठाकूर यांचाही समावेश आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेची गुणी कार्यकर्ती ते सल्लागार समिती सदस्य अशी भरारी घेणाऱ्या ज्योतीताईंना यापूर्वी उत्कृष्ट ग्रामीण लेखिका या पुरस्काराने गौरवले गेले आहे.त्यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले असून त्यांचा “ मध्यावर” कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.आत्तपर्यंत तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष पद भूषवलेल्या ज्योतीतईंच्या नेतृत्वात झालेले पालघर येथे झालेले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन चिरस्मरणीय ठरले.उत्तम वक्त्या,व्याख्याता,सुसंवादिका,कवयित्री तथा साहित्यिका असलेल्या ज्योतीताई समाजकारण,राजकारण,शिक्षण,साहित्य,संस्कृती,कला-क्रीडा व भारतीय अध्यात्म संस्थाशीही जोडल्या गेल्या आहेत.या बहुआयामी,संवेदनशील व सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार पदी नियुक्ती झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.