भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू
शिरूर :- भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना न्हावरा चौफुला रस्त्यावर बुधवार दि.१० डिसेंबरला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
संदीप पांडुरंग ताकवणे वय -४३ रा.पारगाव ता.दौंड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,ताकवणे हे दुचाकीवरून न्हावरा चौफुला रस्त्यावरून घरी जाताना रस्ता ओलांडत होते.पारगावहून चौफुल्याकडे वेगाने जाणा-या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.ताकवणे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले.डाॅ.सचिन भांडवलकर यांनी त्यांना मृत घोषित केले.
संभाजी ताकवणे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये टेम्पोचालकाविरोधात तक्रार दिली.
ताकवणे यांचे वडील स्वर्गीय पांडुरंग ताकवणे यांना संदीप हे एकूलते एक चिरंजीव होते.५ वर्षांपूर्वी पांडुरंग ताकवणे यांचे निधन झाले.नंतर कुटुंब प्रमुख असणारे संदीप यांचाही अपघाती मृत्यू झाला.घरामध्ये कोणीच कर्ता पुरुष राहिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संदीप ताकवणे यांच्या मागे आई,पत्नी,दोन चिमुकल्या मुली,मुलगा असा परिवार आहे.