दौंडच्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन
शिरूर:- दौंड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांचे वयाच्या ९० वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे येथील खाजगी रूग्णालयात त्या़ंच्यावर उपचार सुरू होते असे समजले. दौंड नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्षाचा बहुमान मिळविणा-या उषा देवी जगदाळे यांनी ३१ मार्च १९७१ ते ३१ मार्च १९७२,९ एप्रिल १९७२ ते २८ आॅक्टोबर १९७२ या कालावधीत नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले. १९७२ ते १९७७ आणि १९८५ ते १९९० या कालावधीत त्यांनी दौंड मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती कृष्णराव बाजीराव जगदाळे पाटील यांनी १९८० ते १९८५ या कालावधीत दौंड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. दौंड तालुक्यातील खानवटे येथील राजेभोसले घराण्यातील उषा देवी कन्या होत्या. १२ एप्रिल १९७६ रोजी दौंड -पुणे -दौंड रेल्वे शटलला त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना झाली होती. १२ एप्रिल २०१६ रोजी दौंड -पुणे शटलच्या ४० व्या वर्धापनदिनी त्यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला होता. दौंड तालुक्यातील सिंचन व्यवस्था,कुरकुंभ एम आय डी सी,रस्ते,रेल्वे स्थानकांची निर्मिती आदी पायाभूत प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागले.दौंड शुगर लिमिटेडचे संस्थापक संचालक वीरधवल जगदाळे हे त्यांचे जेष्ठ पुत्र तर विद्यमान नगरसेवक इंद्रजित जगदाळे हे त्यांचे धाकटे पुत्र होत.