ग्रामपंचायत सदस्याची बायको लाखो रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली
कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते लखन बेनाडे यांच्या पत्नीनेच त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
तब्बल 8 लाख रुपये हडप करून, घरातील दागिने घेऊन पत्नीने प्रियकरासोबत पळ काढला आहे. याबाबत लखन बेनाडे यांनी पत्नी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शिवाय पत्नीला परत न्यायचे असेल तर 3 लाख रुपये दे अशी मागणी प्रियकरनेच केल्याचेही बेनाडे यांनी तक्रारीत सांगितले आहे. फिर्याद दिल्याचे कळताच पत्नीने पोलीस स्टेशनच्या बाहेरून व्हिडिओ करत नवऱ्याला धमकावल्याचे सांगितले जाते. बेनाडे यांच्या तक्रारीनंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली 2 वर्ष काम करत आहे. 2023 मध्ये बेनाडे यांची लक्ष्मी लोंढे या महिलेसोबत ओळख झाली. मात्र लक्ष्मी लोंढे हिचे विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध होते. कारण विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाले आणि लक्ष्मीने विशालपासून सुटका व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला.
त्यानंतर बेनाडे यांच्याशी लग्न करण्याचा बनाव केला. 2024 मध्ये लखन बेनाडे आणी लक्ष्मी लोंढे यांचा विवाह झाला. लग्न होताच लक्ष्मीने पुन्हा विशाल गस्तेच्या मदतीने लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांचे निमित्त करून लक्ष्मीने लखनकडून 8 लाखांहून अधिकची रक्कम हडप केली. लखन बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीने सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखन यांना सोडून विशाल गस्ते सोबत पुन्हा पळून गेली.
दरम्यान, लक्ष्मी यांना आणायला गेलेल्या बेनाडे यांना गस्ते यांनी पुन्हा मारहाण केली. तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर 3 लाख रुपये रोख दे अशी धमकी विशाल गस्तेने लखन बेनाडे यांना दिली. लक्ष्मी प्रियकरासोबत पुन्हा पळून जाऊन तिने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच लखन बेनाडे यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.