• Total Visitor ( 449598 )
News photo

मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका

Raju tapal May 26, 2025 88

मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग;

मध्य रेल्वेला फटका;

नागरिकांना सतर्कतेचा इशारा 



मुंबई :- मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.



पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडतआहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.



त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ज्या सूखसरींची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement