• Total Visitor ( 435886 )
News photo

सर्वसमावेशकता हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य : डॉ. धोंडीराम पवार

Raju tapal May 31, 2025 117

सर्वसमावेशकता हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य : डॉ. धोंडीराम पवार



तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात अर्थशास्त्र व मराठी विषयाची अभ्यासक्रम कार्यशाळा 



शिक्रापूर :- लवचिकता आणि सर्वसमावेशकता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य असून तळागाळापर्यंत हे धोरण समर्थपणे पोहोचवणे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार यांनी केले. 

तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि. पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी व अर्थशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित द्वितीय वर्ष अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पवार बोलत होते. 

शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिवाजी ढगे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील उगले, मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. संदीप सांगळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले की, देशभरात सर्वत्रच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता प्रभावीपणे लागू झालेले आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षण या टप्प्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अनेक लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेतील सर्वच घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत करून अधिक प्रवाही आणि गतिशील पद्धतीने या धोरणाची अंमलबजावणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. आंतरविद्याशाखीयता अधिक परिणामकारकतेने  राबवण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अधिक पूरक असल्याचेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध अभ्यास मंडळांनी अधिक दर्जेदार आणि काळाशी सुसंगत असा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले बहुमूल्य योगदान देणे अपेक्षित असल्याचेही डॉ. धोंडीराम पवार म्हणाले.

मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सुधाकर शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाषिक लवचिकता हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. त्या अनुषंगाने मराठी सारख्या मातृभाषेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असलेले प्राधान्य अधिक प्रेरणादायी असल्याचे डॉ.

शेलार यांनी सांगितले. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांमध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी विद्यापीठ पातळीवर व्यापक चर्चा आणि संवाद होणे आवश्यक असल्याचेही डॉ. शेलार यावेळी म्हणाले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी ढगे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमांची निर्मिती करताना विद्यार्थी हा घटक केंद्रबिंदू म्हणून अभ्यास मंडळांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल जाणून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कौशल्यधिष्टीत आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळ निश्चित प्रयत्न करेल असा आशावादही डॉ. ढगे यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देशातील सर्वांसाठीच आव्हान नसून संधी असल्याचे ते म्हणाले. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूरक असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा प्राचार्य डॉ . मुसमाडे यांनी याप्रसंगी घेतला. 

 अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लवचिकतेवर भर दिला. देशातील प्रादेशिक भाषांना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेले महत्त्व निश्चित कौतुकास्पद असून यामुळे मातृभाषेचे महत्व निश्चित वाढणार असल्याचेही महेशबापू म्हणाले. व्यावसायिक शिक्षण आणि अभ्यासक्रम देखील आता स्थानिक भाषेतून येत असल्याने आपल्या सर्वांनीच या प्रक्रियेचे स्वागत करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 

प्रस्तुत द्वितीय वर्ष अर्थशास्त्र व मराठी अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे समन्वयक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ पाटील आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे यांनीही याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. 

प्रा. डॉ. दत्तात्रेय वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. रवींद्र भगत यांनी आभार मानले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित अर्थशास्त्र व मराठी विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेमध्ये पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण १५० प्राध्यापकांनी सहभाग घेतला.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement