प्राणघातक बॅक्टेरियांविरोधात भारताचं अँटिबायोटिक जगात भारी,
Raju tapal
December 07, 2024
19
प्राणघातक बॅक्टेरियांविरोधात भारताचं अँटिबायोटिक जगात भारी,
विविध आजारांवरील उपचार, त्यावरील औषधं हा आपल्या आरोग्यव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अँटिबायोटिक्स ही औषधांची अत्यंत महत्त्वाची श्रेणी आहे. मात्र सर्व प्रकारच्या संसर्गांवर सातत्यानं मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक्सचा वापर झाल्यामुळे कालांतरानं जीवाणूंसारखे सूक्ष्मजीव या औषधांना सरावले आहेत. त्यामुळे या औषधांची परिणामकारकता कमी झाली आहे.
विविध अभ्यास आणि संशोधनातून ही बाब प्रकर्षानं समोर येते आहे. भविष्यात मानवी आरोग्यासंदर्भात मोठं आव्हान ठरू शकणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याविषयी...
अँटिबायोटिक्स किंवा प्रतिजैविकांकडे जीव वाचवणारी औषधं म्हणून पाहिलं जातं.
मात्र, या अँटिबोयोटिक्सना मिळत असलेल्या आव्हानात वाढ होते आहे. त्यांना अधिकाधिक धूर्त किंवा हुशार अशा शत्रूला तोंड द्यावं लागतं आहे. हा शत्रू म्हणजे जीवाणूंसारखे सूक्ष्मजीव. असे जीवाणू जे अँटिबोयोटिक्सशी जुळवून घेतात, त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणतात.
तसंच त्यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गाना बरं करण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अँटिबायोटिक्सचा हुशारीनं सामना करतात आणि औषधांविरोधात प्रतिकार क्षमता विकसित करतात.
'द लॅन्सेट' या वैद्यकीय क्षेत्रातील नियतकालिकानुसार, अँटिबायोटिक्सरोधक असलेल्या या सुपरबग्स म्हणजे चलाख जीवाणुंमुळे 2021 मध्ये जगभरात 11.4 लाख मृत्यू झाले.
गंभीर संसर्गाविरोधातील बचावाची पहिली पायरी म्हणून अँटिबायोटिक्सकडे पाहिलं जातं. मात्र, या सर्व रुग्णांच्या बाबतीत अँटिबायोटिक्सचा काहीही प्रभाव पडला नाही.
'अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स' म्हणजे जीवाणूंच्या अँटिबायोटिक्सरोधकतेचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
2019 या एका वर्षातच अँटिबायोटिक-रेझिस्टन्स किंवा अँटिबायोटिक्स-प्रतिरोधक संसर्गांमुळे 3,00,000 मृत्यू झाले. दरवर्षी जवळपास 60,000 नवजात बालकांचे मृत्यूदेखील यामुळेच होत आहेत.
भारतात विकसित झालेल्या औषधाचं महत्त्व
मात्र, याबाबतीत काही आशेचे किरण आहेत. स्थानिक पातळीवरील विकसित करण्यात आलेल्या नव्या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स-प्रतिरोधक जीवाणूंशी लढण्याची क्षमता दिसते आहे. जीवाणूंवर मात करण्याचा शेवटचा उपाय म्हणून ही औषधं अतिशय महत्त्वाची देखील ठरत आहेत.
चेन्नईस्थित ऑर्किड फार्मा या औषधनिर्मिती कंपनीनं एनमेटॅझोबॅक्टम (Enmetazobactam) विकसित केलं आहे. भारतात शोध लागलेलं आणि अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) मंजूर केलेलं ते पहिलं अँटिबायोटिक आहे. हे अँटिबायोटिक इंजेक्शनद्वारे दिलं जातं.
युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन्स (UTIs), न्यूमोनिया आणि रक्तातील संसर्ग यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी हे अँटिबायोटिक प्रभावी आहे. हे अँटिबायोटिक जीवाणूंवर हल्ला चढवण्याऐवजी त्यांच्या संरक्षण प्रणालीला लक्ष्य करतं.
अतिदक्षता विभागांमध्ये औषध-प्रतिरोधक संसर्ग सर्वात जास्त प्रमाणात आढळतात
अनेकदा जीवाणू, अँटिबायोटिक्सना नष्ट करण्यासाठी बीटा-लॅक्टामेझसारखे एन्झाईम (एक प्रकारचं रसायन) तयार करतात. एनमेटाझोबॅक्टम हे अँटिबायोटिक अशाप्रकारच्या एन्झाईम्सना घट्ट बाधून ठेवतं, त्यांचा प्रभाव संपवतं आणि त्यानंतर जीवाणूला प्रभावीपणे नष्ट करतं.
सोप्या भाषेत या प्रक्रियेबद्दल सांगायचं तर हे औषध जीवाणूंना सहजपणे प्रतिकार न करता जीवाणूंचं 'शस्त्र' निष्प्रभ करतं. यामुळे इतर अँटिबायोटिक्सचा प्रभावीपणादेखील टिकवून ठेवता येतो. यात कार्बापेनेम्सचाही समावेश आहे, जे शेवटच्या विश्वासार्ह औषधांपैकी एक आहेत.
या नव्या अँटिबायोटिक किंवा औषधाच्या चाचण्या 19 देशांमध्ये घेण्यात आल्या. या औषधाला जगभरातील औषध नियामक यंत्रणांनी मान्यता दिली आहे. 1,000 हून अधिक रुग्णांवर या औषधाची परिणामकारकता दिसून आली आहे.
"कित्येक वर्षांमध्ये अँटिबायोटिक्सविरोधात विकसित झालेल्या, अँटिबायोटिक्सला निष्प्रभ ठरवणारी क्षमता विकसित झालेल्या जीवाणूंच्या बाबतीत या नव्या औषधाची ताकद, परिणामकारकता दिसून आली आहे. हे औषध हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या थेट शिरांमधून (intravenous) (IV)दिले जाते. (म्हणजेच ज्याप्रमाणे सलाईन लावली जाते त्याप्रकारे हे औषध दिलं जातं.) विशेषकरून गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांना याप्रकारे हे औषध दिलं जातं. ते इतर औषधांप्रमाणे दुकानांमध्ये काऊंटरवर मिळत नाही," असं डॉ. मनीष पॉल यांनी बीबीसीला सांगितलं. ते या औषधाचे सह-शोधककर्ते आहेत.
अँटिबायोटिक्सवरील नवीन संशोधनं
मुंबईस्थित वोकहार्ट ही औषधनिर्मिती कंपनी झेनिक (Zaynich) एका नवीन अँटिबायोटिकवर चाचण्या करते आहे. हे औषध गंभीर स्वरूपाच्या औषध-प्रतिरोधक संसर्गांसाठी आहे.
हे औषध 25 वर्षांहून अधिक कालावधीत विकसित करण्यात आलं असून ते सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात (Phase-3)आहे. पुढील वर्षी हे औषध बाजारात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
वोकहार्टचे संस्थापक चेअरमन डॉ. हबीब खोराकीवाला यांनी झेनिक या औषधाचं वर्णन "सर्व प्रमुख सुपरबग्स (अँटिबायोटिकप्रतिरोधक जीवाणू) वर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेलं या प्रकारचं पूर्णपणे नवीन असं अँटिबायोटिक असं केलं आहे."
या औषधांच्या परिणामाचा अभ्यास करताना ते भारतातील अतिशय गंभीर आजारी असलेल्या 30 रुग्णांना देण्यात आलं. या रुग्णांवर इतर कोणत्याही अँटिबायोटिक्सचा परिणाम होत नव्हता. उल्लेखनीय बाब म्हणजे, या नव्या अँटिबायोटिकमुळे या सर्व गंभीर आजारी रुग्णांचा जीव वाचला.
डॉ. खोराकीवाला म्हणाले, "या औषधाचा भारताचा अभिमान वाटेल."
,मुंबईस्थित वोकहार्ट, औषध-प्रतिरोधक जीवाणूंवर प्रभावी ठरू शकणाऱ्या नव्या अँटिबायोटिक्सवर चाचण्या करतं आहे
वोकहार्टचे नॅफिथ्रोमायसिन (Nafithromycin) हे औषध देखील चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. त्याला मिकनाफ (MIQNAF)या नावानं ट्रेडमार्क करण्यात आलं आहे. समुदायात जीवाणूच्या संसर्गातून होणाऱ्या न्यूमोनियासाठी तीन दिवस तोंडावाटे हे औषध दिलं जातं.
या औषधाची परिणामकारकता किंवा यशाचा दर 97 टक्के आहे. सध्या या आजारावर उपलब्ध असलेल्या औषधांमध्ये 60 टक्के इतर प्रतिकार दर आहे. हे प्रमाण खूप जास्त आहे.
या नव्या औषधाच्या चाचण्या पुढील वर्षी पूर्ण होणार आहेत. एकदा या औषधाला मंजूरी मिळाली की पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध करून दिलं जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे.
30 जणांची टीम असलेल्या बंगळुरूतील बगवर्क्स रिसर्च या बायोफार्मानं जिनिव्हास्थित ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप (GARDP) या संस्थेशी भागीदारी केली आहे.
गंभीर स्वरुपाच्या औषध- प्रतिकार संसर्गांवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्सची एक नवीन श्रेणी विकसित करण्यासाठी ते संयुक्तरित्या काम करणार आहेत. त्यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेलं हे औषध सध्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात (Phase-1) असून पाच ते आठ वर्षांनी ते बाजारात लाँच होईल.
भारतातील अँटिबायोटिक्सच्या संशोधनाची स्थिती
बगवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आनंदकुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "अँटिबायोटिक्सचा प्रभाव कमी होत चालला आहे. मात्र, कर्करोग, मधुमेह आणि इतर आजारांवरील औषधांमध्ये मोठा पैसा आहे, अँटिबायोटिक्समध्ये तो नाही. अँटिबायोटिक्सच्या शोधासाठीचे प्रयत्न फार थोडे आहेत. कारण त्याला शेवटचा पर्याय म्हणून ठेवलेलं असतं. मोठ्या औषधनिर्मिती कंपन्या अँटिबायोटिक प्रतिरोधकावर लक्ष केंद्रीत करत नाही. आम्हाला विविध संस्थांकडून निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, आम्हाला मिळालेल्या निधीपैकी 10 टक्क्यांहून कमी निधी भारतातून आला आहे."
मात्र, या स्थितीत बदल होण्याची आवश्यकता आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) 2023 च्या औषध प्रतिकार निगराणी अहवालामध्ये अँटिबायोटिक प्रतिरोधकतेबाबतच्या चिंताजनक ट्रेंड्सवर प्रकाश टाकला आहे.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की भारतात रुग्णांना ज्या प्रकारे अँटिबायोटिक लिहून दिली जातात किंवा त्यांचं प्रिस्किप्शन दिलं जातं, त्या पद्धतीत तातडीनं सुधारणा करण्याची आवश्यकता आहे
या अहवालात भारतातील 21 स्पेशालिटी हॉस्पिटलमधील जवळपास 1,00,000 बॅक्टेरियल कल्चर (जीवाणूंचा ओळख पटवण्यासाठीची प्रयोगशाळेतील पद्धती)चं विश्लेषण करण्यात आलं.
सर्वसामान्यपणे अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये ई-कोलाय (E.coli) (Escherichia coli)हा जीवाणू आढळतो. हा सर्वाधिक वेळा वेगळा केलेला जीवाणू होता.
यानंतर क्लेबसिएला न्युमोनिए (Klebsiella pneumoniae) हा जीवाणू होता. या जीवाणूमुळे न्यूमोनिया होतो आणि तसंच रक्त, त्वचेतील जखमा आणि मेंदूतील अस्तरांना यामुळे संसर्ग होऊन त्यामुळे मेनिनजायटीस (meningitis) सारखा गंभीर संसर्ग होतो.
यानंतर ऍसिनेटोबॅक्टर बॉमन्नी (Acinetobacter baumannii) या बहुऔषध-प्रतिरोधक जीवाणूचा क्रमांक येतो. अतिदक्षता विभागात जीवनरक्षक यंत्रणांवर असलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवर हा जीवाणू हल्ला करतो.
अँटिबायोटिक्सची कमी होत असलेली परिणामकारकता
या सर्वेक्षणात आढळलं की ई-कोलाय या जीवाणूच्या बाबतीत अँटिबायोटिकची परिणामकारकता सातत्यानं आणि झपाट्यानं कमी होते आहे. तर क्लेबसिएला न्युमोनिएच्या बाबतीत औषध-प्रतिकारकतेच्या बाबतीत चिंताजनक वाढ दिसून आली.
डॉक्टरांना आढळलं की या जीवाणूंमुळे झालेल्या संसर्गावर उपचार करण्यासाठी काही मुख्य अँटिबायोटिक्स 15 टक्क्यांहून कमी प्रभावी ठरत आहेत.
कार्बापेनेम्स (carbapenems)या अत्यंत महत्त्वाच्या आणि अखेरच्या टप्प्यावर वापरण्यात येणाऱ्या अँटिबायोटिकच्या बाबतीत वाढत असलेली प्रतिकारकता ही सर्वात चिंतेची बाब होती.
"हे जीवाणूंबरोबर लपंडाव खेळण्यासारखं आहे. ते अत्यंत वेगानं उक्रांत होतात आणि आपण त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही एकावर मात करता आणि दुसरा उभा राहतो. आपण अधिक संशोधन करण्याची आणि उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. तसंच आधी केलेल्या चुकांमधून शिकण्याची आवश्यकता आहे," असं डॉ. मॅनिका बालासेगरम यांनी बीबीसीला सांगितलं. ते ग्लोबल अँटिबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप (GARDP)चे कार्यकारी संचालक आहेत.
भारतात ज्या हॉस्पिटलमध्ये गर्दी असते ती संसर्गांची केंद्र आहेत
जीएरआरडीपी भारतावर लक्ष केंद्रित करत आहे यात आश्चर्य नाही. झॉलिफ्लोडॅसिन (zoliflodacin) या औषधाच्या निर्मितीसाठी ते हैदराबाद स्थित ऑरिजीन फार्मास्युटिकल सर्व्हिसेबरोबर संयुक्तपणे काम करत आहेत.
गोनोरिया या लैंगिक संसर्गजन्य आजारावरील ते एक महत्त्वाचं अँटिबायोटिक असून ते रुग्णांना तोंडावाटे दिलं जाणार आहे. गोनोरियाच्या जीवाणूंचा अँटिबायोटिक्स बाबत असलेली प्रतिकारशक्ती वाढत असल्याचं दिसतं आहे. याचबरोबर जीएआरडीपीनं जपानमधील शिओनोगी या औषधनिर्मिती कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.
सेफिडेरोकोल (cefiderocol) या एफडीएकडून मंजुरी मिळालेल्या अँटिबायोटिकच्या 135 देशांमधील वितरणासंदर्भात ही भागीदारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर याचं उत्पादन भारतात करण्याचीही योजना आहे.
युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन्स (UTIs) आणि हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या न्युमोनिया सारख्या गंभीर संसर्गांवर उपचार करण्यासाठी या अँटिबायोटिकचा वापर केला जातो.
भारतात अँटिबायोटिक्सच्या वापरातील बदलाची आवश्यकता
मात्र, संपूर्ण विषयाचा हा फक्त एक भाग आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की भारतात रुग्णांना ज्याप्रकारे औषधं सांगितली जातात किंवा त्यांचं प्रिस्क्रिप्शन दिलं जातं त्यात तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
अँटिबायोटिक्सचा व्यापक स्वरुपात वापर करण्यात आल्यामुळे ते अनेक प्रकारच्या जीवाणूंना लक्ष्य करतात. मात्र, त्यामुळे चांगले जीवाणूदेखील मारले जातात.
तसंच अँटिबायोटिक्समुळे दुष्परिणाम देखील होऊ शकतात आणि अँटिबायोटिक-प्रतिरोधकता वाढल्यामुळे औषधांविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण झालेल्या जीवाणूंच्या उदयाला प्रोत्साहन मिळतं.
डॉक्टर्स म्हणतात की त्याऐवजी, सरसकट अँटिबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी विशिष्ट प्रकारच्या अँटिबायोटिक्सना प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र, हॉस्पिटलमध्ये अनेकदा अँटिबायोग्राम नसतात. अँटिबायोग्राम म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रावर आधारित अँटिबायोटिकच्या वापरासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वं.
अँटिबायोग्राम नसल्यामुळे डॉक्टर्स रुग्णांना 'व्यापक स्वरूपात आणि आंधळेपणानं' अँटिबायोटिक्स लिहून देतात.
"आमच्याकडे ही नवी औषधं असतील यामुळे मी नक्कीच उत्साहित झालो आहे. मात्र, याचबरोबर हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे की याआधी आपण ज्याप्रमाणे महत्त्वाच्या अँटिबायोटिक्सचा वापर केला त्याप्रकारे या नव्या औषधांचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण यंत्रणा निर्माण केली पाहिजे. औषधांच्या अयोग्य आणि बेजबाबदार वापरामुळे या नव्या औषधांची परिणामकारकता कमी होईल," अशी चेतावणी डॉ. कामिनी वालिया या निमित्तानं देतात. त्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मध्ये वैज्ञानिक आहेत.
अँटिबायोटिक्सला प्रतिकार करण्यासाठी जीवाणूंमध्ये वेगानं होणाऱ्या बदलांमुळे, जे काही तासांमध्ये विकसित होऊ शकतात, सर्वंकष दृष्टीकोनाची आवश्यकता अधोरेखित होते.
यामध्ये चांगलं पाणी, स्वच्छता आणि साफसफाई यामुळे संसर्गात घट करणं तसंच लसीकरणात वाढ करणं, हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संसर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची धोरणं, डॉक्टरांना यासाठी शिक्षित करणं आणि स्वत:च औषधं घेण्यापासून रुग्णांना प्रतिबंध करणं यासारख्या बाबींचा समावेश आहे.
"जीवाणू, विषाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्ये अँटिबायोटिक्सविरोधात निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचा सामना करणं हे आरोग्यव्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत उत्तरदायित्वाशी समोर असलेलं खूप गुंतागुतींचं आणि बहुआयामी आव्हान आहे," असं डॉ. वालिया म्हणतात.
यातून मिळणारा संदेश स्पष्ट आहे. जर आपण यासंदर्भात तात्काळ पावलं उचलली नाहीत, तर भविष्यात आपल्यासमोर तुलनेनं अगदी किरकोळ असलेल्या संसर्गांवर देखील उपचार न करता येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
Share This