• Total Visitor ( 601819 )
News photo

आंतरराष्ट्रीय योग दिन" गुजर प्रशालेत उत्साहात साजरा

Raju Tapal publisher June 21, 2026 57

आंतरराष्ट्रीय योग दिन" गुजर प्रशालेत उत्साहात साजरा



शिरूर:- तळेगाव ढमढेरे (ता‌.शिरूर) स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार,दि.२१जून २०२६ रोजी विविध योग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग,मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मकुमारी संस्थेच्या अर्चना दीदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच विविध योगमुद्रा व प्राणायामांची प्रात्यक्षिके करून घेत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे यांनी ही माहिती "टिटवाळा न्यूज" ला दिली. प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक प्रभाकर मुसळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले. योगामुळे शरीर निरोगी राहण्याबरोबरच मनाची एकाग्रता,आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने योगाच्या विविध प्रकारांचे सादरीकरण केले. प्रशालेचे क्रीडाशिक्षक राजेंद्र भगत आणि नंदा सातपुते व गोरक्षनाथ वाळके यांनीही विद्यार्थ्यांना योगाचे फायदे,योग्य पद्धतीने योगाभ्यास करण्याच्या सूचना तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत प्रशालेतील सर्व शिक्षकांनीही योगाभ्यासात सहभागी होत योग दिनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. या उपक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे तसेच ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाज घडविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशालेचे कौतुक केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement