पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला पत्नीच जबाबदार?
डोंबिवलीतील पोलीस कर्मचारी श्रीराम मिसाळ आत्महत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्रीराम यांनी 28 एप्रिल 2026 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात श्रीराम मिसाळ यांच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम मिसाळ आणि शिवगंगा यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच शिवगंगाने हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले होते. मी तुझ्यापेक्षा 2 वर्षे वरिष्ठ आहे आणि माझा पगारही तुझ्यापेक्षा जास्त आहे,असे टोमणे मारून ती श्रीराम यांचा मानसिक छळ करत असे. अनेकदा ती श्रीराम यांना स्वतःच्या घरातून रात्रभर बाहेर ठेवत होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरही त्यांचा अपमान करत होती,असे लक्ष्मण मिसाळ यांच्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. या आत्महत्या प्रकरणात श्रीराम यांचे सहकारी पोलीस कर्मचारी संगप्पा भुजबळ यांचे नावही समोर आले आहे. शिवगंगा आणि भुजबळ यांच्यातील संबंधांमुळे श्रीराम यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता,असा दावा लक्ष्मण मिसाळ यांनी केला आहे. या संदर्भातील काही महत्त्वाचे ऑडिओ रेकॉर्डिंग्जदेखील पुरावा म्हणून पोलिसांकडे देण्यात आले आहेत. यामुळे आता पोलीस मित्र संगप्पा भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी श्रीराम यांची पत्नी शिवगंगा उर्फ मिथिला मिसाळ हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना किरण नावाच्या एका महिलेचे नावही समोर आले असून तिची देखील चौकशी केली जाणार आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार,तपास पूर्ण झाल्यानंतर संगप्पा भुजबळ आणि संबंधित महिलेवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.