• Total Visitor ( 506424 )
News photo

अमेरिकेत महाराष्ट्र दिनाचा भव्य सांस्कृतिक सोहळा दिमाखात संपन्न

Raju Tapal publisher May 03, 2026 14

अमेरिकेत महाराष्ट्र दिनाचा भव्य सांस्कृतिक सोहळा दिमाखात संपन्न



शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती

 



अमेरिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार वातावरणात पार पडला. बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमाने परदेशातही मराठी संस्कृतीची श्रीमंती आणि वैभव अधोरेखित केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना डॉ.शिंदे यांनी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांकडून जपली जात असलेली मराठी भाषा,परंपरा आणि संस्कृती यांचे विशेष कौतुक केले. तसेच खासदार मिलिंद देवरा ही यावेळी उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जगविख्यात अशा हार्वर्ड विद्यापीठाच्या हार्वर्ड केनेडी विद्यालयात 'Strategies for Inclusive Growth' - समावेशक विकासासाठीची धोरणे याचा अभ्याक्रम पूर्ण करत आहे. या दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांना बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM) यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून या सांस्कृतिक सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला “राजा शिवछत्रपती देवगिरी ते रायगड” हा भव्य नाट्याविष्कार अमेरिकेतील स्थानिक मराठी कलाकारांनी अत्यंत प्रभावी आणि दमदार पद्धतीने सादर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची,स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची आणि त्यांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांची झलक या नाट्यप्रयोगातून प्रभावीपणे उभी करण्यात आली. या सोहळ्यात लहान मुलांपासून ते प्रौढ कलाकारांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पारंपरिक नृत्य,संगीत,नाट्यप्रयोग आणि इतर कलात्मक सादरीकरणांमधून मराठी संस्कृतीचे विविध रंग अनुभवायला मिळाले.  बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ या संस्थांमार्फत अमेरिकेतील विविध शहरांमध्ये वर्षभर सांस्कृतिक,सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. मराठी भाषा आणि परंपरा जिवंत ठेवण्याबरोबरच परदेशात वाढणाऱ्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थांमार्फत सातत्याने केले जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्याची आणखी एक प्रभावी झलक पाहायला मिळाली. एकंदरीतच,महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित हा भव्य सांस्कृतिक सोहळा केवळ एक कार्यक्रम न ठरता,परदेशातही मराठी अस्मिता जपण्याचा,ती अधिक दृढ करण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचवण्याचा एक प्रेरणादायी आणि स्मरणीय उपक्रम ठरला.



बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळाचे काम उत्तम - डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे



या सर्व कार्यक्रमांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आनंद घेतला. यावेळी बोलताना त्यांनी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांकडून जपली जात असलेली भाषा,परंपरा आणि संस्कृती यांचे विशेष कौतुक केले. परदेशात राहूनही आपल्या मुळांशी घट्ट नाळ जपणाऱ्या या मंडळांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये मराठी संस्कृतीबद्दल अभिमान आणि आत्मीयता निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM) यांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement