समयसूचकता दाखविणा-या दाम्पत्याचा मंचर पोलिसांकडून सन्मान
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- खेळता - खेळता आई वडिलांपासून दूर गेलेल्या, रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन लहानग्यांना पोलीसांच्या स्वाधीन करून समयसूचकता दाखविणा-या दाम्पत्याचा मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जनाबाई सिताराम वाघमारे यांचा मुलगा रोहन वय - अडीच वर्षे, सोनाली मंगेश मुकणे यांचा मुलगा निखिल वय -४ वर्षे हे खेळता -खेळता साधारणतः २ किलोमीटर अंतर पार करून जीवन मंगल कार्यालयासमोर गेले होते. घरी पुन्हा माघारी कसे जायचे हे त्यांना सुधारत नव्हते. ते दोघे महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्नांत असतानाच मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेवून मोटरसायकल वरून सकाळी ११ वाजता नारायणगावच्या दिशेने जात असलेल्या खंडागळे दाम्पत्याने मुलांचे रडणे पाहून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना काहीच सांगता न आल्याने खंडागळे दाम्पत्याने या दोन्ही लहानग्यांना मंचर प़ोलिसांकडे सुपूर्द केले.पोलीसांनी दोन्ही लहानग्यांना गोळ्या,बिस्कीट,चाॅकलेट,व पाणी देवून शांत केले.
पोलीस पथक दोन्ही लहानग्यांच्या आई वडिलांचा शोध घेत होते. दुपारी ३ वाजता दोन्ही लहानग्यांना त्यांची आई जनाबाई वाघमारे,सोनाली मुकणे यांच्या ताब्यात दिले. दोन्ही लहानगे काही क्षणात त्यांच्या आईला बिलगल्याने पोलिसांनाही आनंदाश्रू अनावर झाले.
समयसूचकता दाखवून पोलीसांच्या ताब्यात लहानग्यांना दिल्याबद्दल गणेश खंडागळे व मनिषा गणेश खंडागळे रा.हिवरे बुद्रुक ता.जुन्नर या दाम्पत्याचा मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.