मीना म्हसे यांना शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय पुरस्कार
शिक्रापूर:- राज्यस्तरीय “शिक्षण संजीवनी” या मासिकाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मिना म्हसे यांना शिक्षण संजीवनी राज्यस्तरीय पुरस्कार सहसंचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. कमलादेवी आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला असून या वर्षी हा सन्मान जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मिना म्हसे यांना मिळाला. हा कार्यक्रम रविवारी ८ मार्च २०२६ रोजी पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स,टिळक रस्ता,शुक्रवार पेठ येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न झाला. “शिक्षण संजीवनी” या राज्यस्तरीय मासिकाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजासमोर आदर्श उभा करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे,असे कार्यक्रमाचे संयोजक व शिक्षण संजीवनी मासिकाचे संपादक डॉ.संजय जगताप आणि कार्यकारी संपादक देविदास लिमजे यांनी सांगितले. यामध्ये पुणे येथील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अकॅडमीक कौन्सिल मेंबर डॉ.राजश्री जायभाये,प्रा.मीता चौधरी (संचालक,राजपथ अकॅडमी व प्रकाशन,पुणे), कल्पना गवरे (आयोजक,अक्षरविश्व साहित्य संमेलन,लंडन), चंद्रलेखा बेलसरे (ज्येष्ठ साहित्यिका व उद्योजिका) यांचा समावेश होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांना समाजासमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन “शिक्षण संजीवनी मासिक परिवार,पुणे” यांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ.संजय जगताप (कार्यकारी संपादक,शिक्षण संजीवनी मासिक) आणि देविदास लिमजे (संपादक,शिक्षण संजीवनी मासिक) हे असून सूत्रसंचालन सुनीता काटम यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.सतीश सातपुते, दत्तात्रय उभे,विद्याधर चव्हाण,महावीर जाधव,उज्वला जगताप,स्नेहा खडसे आणि देवयानी वैदनकर यांनी केले. महिला सक्षमीकरण, साहित्य संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव या तिहेरी उद्दिष्टाने आयोजित हा कार्यक्रम साहित्यप्रेमी, शिक्षक आणि कवींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना या निमित्ताने आयोजकांनी व्यक्त केली आहे.