परप्रांतीय तरूणाचा कोरेगाव भीमा येथे निर्घृण खून
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे एका परप्रांतीय तरूणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुकेन महातो रा.ओडिसा असे खून झालेल्या परप्रांतीय तरूणाचे नाव असून हत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.आरोपीच्या शोधासाठी शिक्रापूर पोलीसांनी तपास पथके तयार केली आहेत. समजलेल्या माहितीनूसार,कोरेगाव भीमा येथे पुणे -अहिल्यानगर महामार्गालगतच्या एका गृहप्रकल्पालगत एका तरूणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच शिक्रापूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल देशमुख,पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून पुरावे शोधण्यासाठी शिरूर येथील न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे .