अज्ञात वाहनाच्या धडकेत घोलपवाडीतील दुध व्यावसायिकाचा मृत्यू
शिक्रापूर:- डेअरीवर दूध घालून घरी परतणा-या दूधव्यावसायिकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दूध व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील घोलपवाडी येथे घडली. वसंत केरू दोरगे असे अपघातात मृत्यू झालेल्या दूध व्यावसायिकाचे नाव असून समजलेल्या माहितीनूसार,टाकळी भीमा,दोरगे वस्ती येथील ४८ वर्षीय वसंत केरू दोरगे हे सायंकाळी घोलप वाडी येथील दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी गेले होते. डेअरीवर दूध घालून घोलप वाडी -टाकळीभीमा रस्त्याने त्यांच्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होवून ते रस्त्यावर कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दादाभाऊ बाळासाहेब वडघुले वय -३८ रा.टाकळीभीमा यांनी अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली. हवालदार संदीप इथापे अपघाताचा पुढील तपास करत आहेत.