आता शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी 'विनोबा'चा हातभार
जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने नव्या शैक्षणिक पर्वाचा प्रारंभ!
अमरावती :- शासकीय शालेय शिक्षणात गुणवत्ता आणि नवोपक्रम आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत,जिल्हा परिषद अमरावती ने आज 'आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमा' चा शुभारंभ केला आहे. पुणे येथील ‘ओपन लिंक्स फाऊंडेशन’ (OLF) च्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम, जिल्ह्यातील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम बनवून त्यांच्या कार्याला नवी दिशा देणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'विनोबा ॲप' चा प्रभावी वापर.संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांना परस्परांशी जोडून, त्यांच्यात संवाद साधून आणि नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देऊन शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात विनोबा ॲप ने यश मिळवलं आहे. या अभिनव ॲपमुळे शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एक मजबूत व्यासपीठ मिळेल आणि त्यांच्यातील परस्पर संवाद वाढून एक सक्षम शिक्षक समुदाय निर्माण होईल. यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि ते उत्साहाने नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवू शकतील.
या उपक्रमामुळे केवळ शिक्षकांचे सक्षमीकरणच होणार नाही, तर प्रशासकीय स्तरावरही याचा मोठा फायदा होणार आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमांची अंमलबजावणी यामुळे अधिक सुलभ आणि वेगवान होईल. विनोबा ॲपद्वारे निर्माण होणारा हा गतिमान संवाद आणि सहभागाचा दुवा प्रशासनाला शिक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास मदत करेल,ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल.
या निमित्ताने जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी,केंद्र प्रमुख आणि तंत्रस्नेही शिक्षक यांची एकदिवसीय कार्यशाळा जि प माध्यमिक कन्या शाळा आमरावती येथे आज दिनांक १२ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी "अमरावती जिल्ह्याच्या शिक्षण प्रवासातील हे एक महत्त्वाचे वळण आहे,असे म्हटले "आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम' हा केवळ तंत्रज्ञानाचा अवलंब नसून,तो शिक्षकांना प्रेरणा देऊन आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होईल, याची आम्हाला खात्री आहे." असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून नमूद केले.
ओपन लिंक्स फाऊंडेशन चे विश्वजीत पवार (COO) यांनी या प्रसंगी सांगितले की, "शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत. विनोबा ॲपच्या माध्यमातून त्यांना जोडण्यासाठी, शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी एक शक्तिशाली साधन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे वर्गातील अध्ययनानुभव खऱ्या अर्थाने बदलून जाईल. जिल्हा परिषद, अमरावती सोबतची आमची ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची शक्ती दर्शवते."
जिल्हा परिषद अमरावती आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि त्याचा दूरगामी सकारात्मक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहेत, ज्यामुळे शासकीय शालेय शिक्षणात एक नवीन आणि उत्कृष्ट पर्व सुरू होईल. शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी डॉ अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी (प्राथ),सतीश मुगल ( उप.शिक्षणाधिकारी प्राथ) प्रवीण खांडेकर (शि.वि.अधिकारी) संगीता सोनवणे (शि.वि.अधिकारी),सर्व गटशिक्षणाधिकारी व ओपन लिंक फाउंडेशनचे चित्रा खन्ना (विभागीय व्यवस्थापक),सागर गजभिये (जिल्हा प्रकल्प अधिकारी),प्रितेश इजनकर व रघुनाथ वानखडे (कार्यक्रम व्यवस्थापक),वीरेंद्र ब्राह्मण यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तंत्रस्नेही केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.