करंजावणे येथील पुलावर खड्डे
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील करंजावणे येथील पुलावर खड्डे पडून पुलावरील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
शिरूर तालुक्यातील करंजावणे हे गाव माजी आमदार स्वर्गीय बाबूराव दौंडकर यांचे गाव असून या गावाने स्व.बाबूराव दौंडकर यांच्या रूपाने शिरूर तालुक्याला नेतृत्व दिले होते. स्व.बाबुराव दौंडकर यांना त्यावेळी शिरूर तालुक्यातील नागरिक "शिरूरचा सालकरी" म्हणून ओळखत होते. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून ५ किलोमीटर अंतरावर करंजावणे हे गाव असून येथील ओढ्यावरील पुलावर खड्डे पडून पुलावरील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून करंजावणे मार्गे जाणारा रस्ता दहीवडी गावाजवळ न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्याला जोडलेला आहे. इंगळे नगर, उरळगाव,पारोडी,शिवतक्रार म्हाळुंगी,न्हावरे,शिरसगाव काटा,आंधळगाव,कुरूळी,वडगाव रासाई,मांडवगण फराटा,तांदळी तसेच नागरगाव,रांजणगाव सांडस केडगाव,चौफुला या गावांकडे जाणारे -येणारे प्रवासी, वाहनचालक करंजावणे मार्गे प्रवास करत असतात. करंजावणे पुलाजवळचा रस्ता वळणदार असून चढ- उताराचा आहे. पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करत मार्गक्रमण करावे लागते.पुलाची उंची अतिशय कमी आहे.पुलावर पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करण्यासाठी रस्त्याच्या कडेला खडीचा ढीग टाकलेला दिसून येत आहे. पुलावरील खड्डृयांची दुरूस्ती लवकरात लवकर होईल या प्रतिक्षेत प्रवासी,वाहनचालक आहेत.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे