रामदास ढमढेरे यांना" आदर्श सामाजिक कार्यकर्ता" पुरस्कार प्रदान...
शिरूर:- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रामदास ढमढेरे यांना "आदर्श सामाजिक कार्यकर्ता " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जात असून तळेगाव ढमढेरे गावात साजरे होणारे सण, उत्सव, विविध कार्यक्रम यात पुढाकार घेऊन ग्रामीण सांस्कृतिक परंपरा जपण्यास हातभार लावणाऱ्या व्यक्तीस "आदर्श सामाजिक कार्यकर्ता " पुरस्कार दिला जातो. रामदास ढमढेरे हे तळेगाव ढमढेरे गावातील ऐतिहासिक व गावचे वैभव असणाऱ्या हनुमान यात्रेच्या आयोजनात पुढाकार घेत असतात तसेच ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गावात होणारा अखंड हरीनाम सप्ताह,सार्वजनिक गणेशोत्सव,तसेच गावात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व विद्या सहकारी बँक पुणेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी हा पुरस्कार देण्यामागची भूमिका आपल्या मनोगतामधून व्यक्त केली. यात्रा जत्रा या गावचे गावपण आणि ग्रामीण संस्कृती जपण्याचे एक माध्यम आहे, गावचे गावपण टिकण्यासाठी हे यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजेत आणि असे उत्सव साजरे करण्यात जे पुढाकार घेतात त्यांचे कौतुक झाले पाहिजे, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू केला आहे असे त्यांनी आपल्या मनोगतामधून पुरस्कारा विषयी भूमिका व्यक्त करताना सांगितले. यावेळी अनिल ढमढेरे,अमोल घुमे,सचिन पंडित,प्राचार्य अशोक दहिफळे,प्रा. कुंडलिक कदम,प्रा. गुरुनाथ पाटील,रणजित तकटे,प्रदीप ढमढेरे,नवींद्र जगताप,सूर्यकांत महाराज जगताप,जावेद बागवान,शंकर जगताप,चतुर तकटे,संतोष सातपुते,सुरेश ढमढेरे,शंकर मुसळे,ओंकार तकटे,तन्मय घुमे उपस्थित होते.