शिरूर बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान
पाठ्यपुस्तकातील " बचत" या कथेची विशेष दखल
शिरूर:- प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या बालभारती इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात बचत या कथेचा समावेश झाल्याबद्दल शिरूर तालुक्यातील बालकुमार साहित्य संस्थेने गृहभेट देऊन त्यांचा सन्मान केला. निमगाव म्हाळुंगी विद्या विकास मंदीर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे,कवी मनोहर परदेशी आणि राहुल चातुर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. नवीन छपाई करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात यावर्षी प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या बचत या कथेचा समावेश करण्यात आला आहे. या गोष्टीची दखल घेत शिरूर मधील बालकुमार साहित्य संस्थेचे संस्थापक कवी मनोहर परदेशी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिरूर तालुक्यात बालकुमार साहित्य संस्थेचे काम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना व्यासपीठ देऊन त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीसरुपी प्रेरणा देण्याचे काम बालकुमार साहित्य संस्था करत असते. अशा संस्थेकडून माझा सन्मान होतो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी यावेळी सांगितले.