पेरणे फाटा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरक्षा मार्गदर्शन शिबिर
गौतम पाटोळे
फुलगाव:- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव,कायदेशीर साक्षरता आणि सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संत तुकाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पेरणे फाटा (ता. हवेली) येथे महिला सुरक्षा,सायबर गुन्हे आणि रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी पोलीस निरीक्षक खेडकर मॅडम आणि एलपीसी सुवर्णा कर्हे यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक कायदे,आपत्कालीन परिस्थितीत १०९१ व ११२ या हेल्पलाइन क्रमांकांचा वापर,तसेच स्वसंरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करताना सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी,अनोळखी लिंक,मेसेज किंवा ओटीपीवर विश्वास न ठेवणे आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. रस्ते सुरक्षेबाबत हेल्मेट व सीटबेल्टचा वापर,वेगावर नियंत्रण,वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि रस्ता ओलांडताना घ्यावयाची खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक खेडकर व एलपीसी सुवर्णा कर्हे यांचा संस्थेच्या ग्रुप इन्स्ट्रक्टर पडोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कळसकर मॅडम यांनी केले. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सोप्या व रंजक भाषेत उदाहरणांसह मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळून जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प केला.