जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण नेवसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
शिक्रापूर (प्रतिनिधी):- सासवड (ता. पुरंदर) येथील जेष्ठ आणि अभ्यासू पत्रकार, साहित्यिक श्रीकृष्ण देवराम नेवसे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी (ता. २५) निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुरंदर तालुक्यातील पत्रकारितेचा एक आधारस्तंभ कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. गेली ३० वर्षांहून अधिक काळ श्रीकृष्ण नेवसे यांनी पुरंदर तालुक्याच्या पत्रकारितेत सक्रिय योगदान दिले. 'दैनिक सकाळ'मध्ये त्यांनी अनेक वर्षे सातत्याने लेखन करून आपला ठसा उमटवला. सामाजिक,कृषी,राजकीय आणि कला क्षेत्रातील विषयांची त्यांची मांडणी प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असायची. आपल्या ओघवत्या आणि धारदार लेखणीच्या बळावर त्यांनी सासवडसह पुरंदर तालुक्यातील पाणी,शेती,रस्ते अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. नेवसे यांनी आपल्या लेखनातून पुरंदरमधील सिताफळ,अंजीर,भाजीपाला,स्थानिक उत्पादने,कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली. तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी,कलाकार,उपेक्षित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. राज्यातील विविध भागात विखुरलेल्या पुरंदर तालुक्यातील रसवंती चालकांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या या योगदानामुळे जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. नेवसे यांच्या निधनामुळे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,दोन बहिणी,एक भाऊ असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण नेवसे यांचे पत्रकारितेच्या क्षेत्रातील काम,समाजातील वास्तव समोर आणणे,स्थानिक घटना-घडामोडींचे जीवंत वृत्तांकन करणे हे सदैव स्मरणीय ठरेल., अशा भावना व्यक्त करीत आमदार विजय शिवतारे,माजी आमदार संजय जगताप,विजय कोलते,राहूल शेवाळे,नंदकुमार जगताप,प्रदीप जगताप,हेमंत ताकवले, शिरूर तालुक्यातील दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार शरद पाबळे, नितीन बारवकर,प्रा.नागनाथ शिंगाडे,"टिटवाळा न्यूज" चे पत्रकार विजय ढमढेरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 'सकाळ' कार्यालयाचे निलेश राजकीय,शैक्षणिक,कृषी,सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण नेवसे यांच्यावर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.