तावशीगड येथे श्रावणी पोळा उत्साहात साजरा
प्रतिनिधी (गौतम पाटोळे)
फुलगाव:- बळीराजाचा सर्जा-राजा अर्थात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण तावशीगड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी धीरज घोटाळे यांच्या घरी श्रावणी बैलपोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैलांना रंगीबेरंगी सजावट करून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले. बैलांच्या शिंगांना विविध रंग देण्यात आले होते,तसेच गोंडे व विविध अलंकारांनी त्यांची सजावट करण्यात आली होती. तावशीगड येथील शेतकऱ्यांनी वाजतगाजत बैलांची भव्य मिरवणूक काढली. बैलपोळ्यानिमित्त बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करण्यात आली. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बळीराजाच्या शेतीच्या कामात वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.