मृत तनिषा भिसे यांना न्याय मिळावा यासाठी शिरूर पोलिसांना निवेदन
शिरूर :- पुणे येथील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात, तनिषा सुशांत भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने, पुण्यासह सर्वत्र संतापाची लाट पसरलेली असून, सर्वत्र या रुग्णालयाचा निषेध व आंदोलने होत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे या रुग्णालयाने तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी अॅडमिट करण्यासाठी तब्बल दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. ती संबंधित रुग्णाकडे नसल्याने त्यांनी अडीच लाख रुपये देऊ केले. परंतु तरीही रुग्णालय प्रशासनाने ते मान्य न केल्याने, संबंधित रुग्णास इतर रुग्णालयात जावे लागले व त्यातच तनिषा भिसे यांची वाटेत प्रसूती होऊन, दोन जुळ्या बाळांना जन्म दिला, परंतु तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक आल्याने, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत प्रयत्न केले, तरीही या रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने सहकार्य केले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही, शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी शिरूर पोलिसांना निवेदन देत, या धर्मादाय रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनावर कठोर कारवाई करा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा सकल मातंग समाज महाराष्ट्र, अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र, भीम छावा संघटना, मातंग एकता आंदोलन व लहूजी शक्ती सेनेच्या वतीने दिला आहे.
निवेदन देणा-या़ंमध्ये मातंग एकता आंदोलनाचे शिरूर अध्यक्ष सतिश बागवे, बाळासाहेब पाटोळे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष चेतन साठे, शिरूर अध्यक्ष अविनाश शिंदे , अखिल मातंग समाज चळवळीचे संतोष साळवे, सकल मातंग समाज चळवळीचे बाळासाहेब जाधव,पत्रकार रविंद्र खुडे, लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष सोनुभाऊ काळोखे यांचा समावेश आहे.