• Total Visitor ( 544691 )
News photo

एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या-मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव  

Raju Tapal publisher May 27, 2026 29

एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या- मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव  



ठाणे:- जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना शासनामार्फत ही लस पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असून, पालकांनी कोणत्याही अफवा अथवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर कर्करोग मानला जातो. सन २०२४ च्या ICMR-NCRP अहवालानुसार,देशात दरवर्षी सुमारे ७८ हजारांहून अधिक महिलांना या आजाराचे निदान होते, तर ४२ हजारांपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनामार्फत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून,ही लस भविष्यातील कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी प्रभावी सुरक्षा कवच ठरत आहे. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, ‘एचपीव्ही’ लस ही पूर्णपणे सुरक्षित,प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे. सन २००६ पासून जगभरात कोट्यवधी महिलांना ही लस देण्यात आली असून तिचे सकारात्मक परिणाम सिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातही ५५ हजार पेक्षा जास्त मुलींना लसीकरण करण्यात आले असून कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांनुसार या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. भारत सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणारी ‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही’ लस एकाच डोसमध्ये प्रभावी संरक्षण प्रदान करते. मुलगी मासिक पाळीत असली तरीही ही लस सुरक्षितपणे दिली जाऊ शकते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र मुलीपर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षक,आशा सेविका,अंगणवाडी कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने कार्यरत आहेत. सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. पालकांनी आपल्या मुलींच्या निरोगी भविष्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे,असेही प्रशासनाने नमूद केले आहे. “किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही सुविधा सुरक्षित व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement