ठाणे पश्चिमेकडील साकेत रोड परिसरात टँकरने सुझुकी बर्गमन दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेवर धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टँकरच्या धडकेनंतर महिला रस्त्यावर पडली. या भीषण अपघातात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे.
अपघातानंतर जखमी महिलेला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच टँकर चालकाची भूमिका काय होती, याबाबत पुढील तपास सुरू आहे.