तळेगाव ढमढेरे येथे शिक्षक गौरव दिन सोहळा
विजय ढमढेरे
शिरूर:- शिक्षण हे पवित्र व्रत आहे. ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली ते खरेच भाग्यवान आहेत. सेवाभाव जोपासून शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू ठेवावे. या क्षेत्राकडून समाजाच्या खूप अपेक्षा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ.शामराव लवांडे यांनी केले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.लवांडे बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे, शकुंतला फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे,मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. या शिक्षक गौरव दिन सोहळ्यात विशेष कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप सांगळे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.रूपाली अनिल ढमढेरे यांचा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे,अशोक दहिफळे,डॉ. पराग चौधरी,प्राचार्या सुनंदा लोले,उपमुख्यध्यापिका सुनीता पिंगळे,उपशिक्षिका साधना वाघमारे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रा.डॉ.लवांडे पुढे म्हणाले की,ज्ञान आणि शहाणपण भिन्न बाबी आहेत. शहाणपण ही आजच्या समाजाची खरी गरज आहे. माणसाला समाधानाने जगायचे असेल तर शिक्षणाबरोबरच शहाणपण येणे ही आजच्या समाजव्यवस्थेची मूलभूत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या अस्वस्थ वर्तमानात,अवतीभोवतीच्या कोलाहलात शिक्षण हेच एकमेव असे क्षेत्र आहे की जे समाजाला जगण्याचे बळ देऊ शकत असल्याचे लवांडे यांनी सांगितले. शिक्षक हा जगातील सर्वात आनंददायी पेशा आहे. तो खऱ्या अर्थाने अनुभवण्याचे कार्य शिक्षकांनी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. संवादाचा अभाव ही मोठी समस्या आजच्या समाज व्यवस्थेपुढील मोठे आव्हान असून याबाबत वेळीच सर्वांनी सजग असण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आदर्श विद्यार्थ्याची पिढी घडवणारे शिक्षक हेच समाज व्यवस्थेचे मोठे बलस्थान असल्याचे ते म्हणाले. शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशनचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी स्वागत केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासूनच्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. काळाची गरज ओळखून तळेगाव ढमढेरे आणि पंचक्रोशीतील सर्वसामान्यांच्या आणि दुर्दैवाने मुलांसाठी दर्जेदार उच्चशिक्षण देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरविंदादा ढमढेरे यांनी शिक्षकांच्या समर्पित योगदानाचा गौरव केला. शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने सातत्याने शिक्षक वृंदाचा गौरव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यागातून शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था उभी राहिली आहे. या संस्थेचा वटवृक्ष असाच बहरत राहो अशी अपेक्षाही अरविंददादा ढमढेरे यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगोल अभ्यास मंडळ अध्यक्ष आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून प्रास्ताविक केले. शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.संदीप सांगळे यांनी आभार मानले