ठाणे प्रिमियर लीगचा बिगुल १ मे रोजी वाजणार
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार उद्घाटन
ठाणे :-लेदर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी टीपीएल नावाने प्रसिद्ध असणारी क्रिकेट स्पर्धा ठाण्यात रंगणार आहे. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने,मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२६ आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे करण्यात आले आहे. लीगचे यंदा १४ वे वर्ष असून आयपीएल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पहायला मिळणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ॲपेक्स कौन्सिल मेंबर,महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील १६ संघांचा सहभाग असणार आहे. या संघामधून आयपीएल खेळलेले अथर्व अंकोलेकर,अखिल हेरवाडकर,साईराज पाटील,हार्दिक तामोरे,ध्रुमिल मटकर,दिव्यांश सक्सेना,रॉयस्टन डायस,प्रग्नेश कानपिल्लेवार,प्रवीण तांबे हे क्रिकेटपटू खेळणार आहेत. स्पर्धे दरम्यान एकूण चार लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून सर्वोत्तम फलंदाज,क्षेत्ररक्षक,गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस गौरवचिन्ह आणि रोख बक्षिस देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे,मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन विकास रेपाळे यांनी केले आहे. गरजू गुणवंत खेळाडूंचा सन्मान या स्पर्धे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून क्रिकेट साहित्याचे त्यांना वाटप करण्यात येणारअसल्याचे विकास रेपाळे यांनी सांगितले.