केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांचा चाणाक्षपणा
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याची उचल घेवून गावाकडे जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून,रस्त्यात अडवून, मारहाण करून,शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील पावणेदोन लाख रुपये घेवून पळून गेले अशी तक्रार देण्यासाठी केज पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या युवकाच्या बोलण्यात तफावत आढळून आल्याने पोलीसांनी बनावट तक्रार देणा-या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
केज तालुक्यातील तरनळी येथील अंगद अनंत खेडकर याने पोलीसांना सांगितले तो दि.१३ जुलै रोजी ऊसतोड मुकादमाकडून १ लाख ७५ हजार रूपयांची उचल घेवून मोटरसायकलवरून कानडी माळी मार्गे तरनळी या त्याच्या गावाकडे जात असताना रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास कानडी माळी गावाजवळ मोटरसायकलीवरून आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करून त्याला गावापासून दीड किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी अंधारात अडविले.दगडाने मारहाण करत शस्त्राने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या पॅंटच्या खिशातील १ लाख ७५ हजार रूपये, मोबाईल आणि मोटारसायकलची चावी घेवून पळून गेले अशी माहिती अंगद खेडकर याने पोलीस ठाण्यात दिली.
चाणाक्ष असलेल्या पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना शंका आल्याने एवढे पैसे पॅंटच्या खिशात कसे मावले? एवढी रक्कम घेवून तो एकटाच आणि एवढ्या रात्री आडमार्गाने का जात असावा? तसेच एवढ्या रकमेच्या नोटा किती होत्या हे अंगद खेडकर याला विचारताच त्याला सांगता येईना.
पोलीस निरीक्षक उनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल त्रिंबक सोपने यांनी तपास करून सायबर शाखेच्या अधिका-यांनी अंगद खेडकर याच्याशी कोणी,कोणी संवाद साधला याबाबत गुप्त माहिती घेतली. त्यानंतर पोलीसांची खात्री पटली की, तक्रारदाराचे पैसे चोरीला गेले नसून हा बनाव आहे हे निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या आदेशाने महिला पोलिस जमादार निर्मला जाधव यांच्या तक्रारीवरून खोटी माहिती देवून पोलीस यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणा-या अंगद खेडकर याच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दैनिक पुढारी वृत्तपत्राने या वृत्तास प्रसिद्धी दिली आहे.