मांडवगण येथील फराटे कुटूंबियांचा प्रामाणिकपणा
शिक्रापूर:- खात्यावर चुकून आलेली ५ लाख रूपयांची रक्कम संबंधितांकडे सुपूर्द करून शिरूर तालुक्यातील मांडवगण येथील फराटे कुटूंबियांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी येथील उद्धवराव शितोळे यांनी काष्टी येथील बॅंकेत त्यांच्या खात्यात रक्कम जमा करताना चुकून चुकीचा खाते नंबर नमुद केल्याने ५ लाख रूपये अद्वैत विजय फराटे या विद्यार्थ्याच्या शालेय खात्यावर जमा झाले. अद्वैतचे वडील विजय फराटे यांचा मोबाईल क्रमांक लिंक असल्याने २६ डिसेंबरला खात्यात ५ लाख रूपये जमा झाल्याचा संदेश विजय फराटे यांना प्राप्त झाला. दोन दिवस बॅकेला सलग सुट्टी असल्याने सोमवारी बॅंकेत चौकशी केल्यानंतर ही रक्कम उद्धवराव शितोळे यांच्या खात्यातून चुकून ट्रान्स्फर झाल्याचे स्पष्ट झाले. फराटे यांनी तात्काळ शितोळे यांच्याशी स्वतः संपर्क करून संपूर्ण माहिती दिली.त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ५ लाख रूपयांची रक्कम उद्धवराव शितोळे यांच्या खात्यावर परत पाठविण्यात आली. सध्याच्या काळात वस्तू हरविल्याच्या,चोरी झाल्याच्या तसेच पैशांपायी वादावादी झाल्याच्या घटना दिवसेंदिवस ऐकिवात येत आहेत.या पार्श्वभूमीवर मांडवगण येथील फराटे कुटूंबियांनी दाखविलेला प्रामाणिकपणा कौतुकास्पद असून सध्याच्या स्थितीत समाजाला मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे.