रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
शिक्रापूर (प्रतिनिधी):- रिक्षा मध्ये विसरलेली लॅपटाॅपची बॅग परत करत हवेली तालुक्यातील थेऊर फाटा,कुंजीर वाडी येथील रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्थ किशोर पिंपरे हे बकोरी फाटा वाघोली येथे जाण्यासाठी १५ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता लोणी काळभोर एम आय टी काॅर्नर येथून एम एच १२ टी यू ०८२२ या क्रमांकाची रिक्षा करून गेले. बकोरी फाटा येथे उतरल्यानंतर त्यांची लॅपटाॅपची बॅग घाईगडबडीत रिक्षा मध्ये विसरली. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठून मदतीची विनंती केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरू केला.
दरम्यान,रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे वय -३२ यांनी स्वत; अर्थ पिंपरे यांना संपर्क केला.पिंपरे यांनी रिक्षाचे भाडे गुगल पे भरले होते.त्या व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शन आय डी च्या आधारे मित्राच्या मदतीने पिंपरे यांचा मोबाईल क्रमांक व इन्स्टाग्राम अकाऊंट शोधून काढून संपर्क केला. त्यानंतर त्यांनी लॅपटाॅपसह बॅग परत केली.