ट्रम्प-पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी;
अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान
अलास्का :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या अलास्कात झालेल्या बैठकीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. अलास्कामधील त्यांच्या बैठकीमध्ये युक्रेन युद्ध आणि परस्पर संबंधांवरही सखोल चर्चा झाली. मात्र ही बैठक अयशस्वी झाल्याचे मानले जात आहे. भले बैठकीत ठोस काही ठरलं नाही मात्र अजून निर्बंध लागणार नाहीत, निदान हा तरी विश्वास मिळाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बैठक अतिशय 'प्रोडक्टिव्ह' असल्याचे म्हटले आहे, तर व्लादिमीर पुतिन यांनी ही बैठक काही समाधानाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. यावेळी, पुढील बैठक मॉस्कोमध्ये व्हावी, असे म्हणत पुतिन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आश्चर्यचकित केले. ट्रम्प म्हणाले, आपण लवकरच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी चर्चा करू. मात्र, भारताचा विचार करता, अलास्का बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, 'रशियाने एक मोठा तेल ग्राहक गमावला...' असा दावा केला आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? - फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हटले, "रशियाने एक मोठा तेल ग्राहक गमावला आहे, तो म्हणजे भारत. भारत, रशियाच्या तेल व्यापाराचा ४०% एवढा मोठा भाग सांभाळून घ्यायचा. जर मी आता सेकेंडरी निर्बंध लादले, तर हे त्यांच्यासाठी मोठे विनाशकारी ठरेल.
मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे, भारताने रशियाकडून तेल आयात करणे थांबवलेले नाही. अजूनही रशियन तेल खरेदी केले जात आहे. तत्पूर्वी, जर पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी ठरली, तर भारतावरील टॅरीफ अथवा कर आणखी वाढवला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीपूर्वी म्हटले होते. यामुळे आता, बैठक अयशस्वी झाल्याचे मानले जात असताना, अमेरिका भारतावरील टॅरीफ आणखी वाढवणार का? अशा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे ३५-४०% तेल रशियाकडून आयात होते. ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले की, दोन किंवा तीन आठवड्यात या मुद्यावर ते पुन्हा विचार करु शकतात. भारत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे त्रस्त आहे. उत्पन्न आणि रोजगार दोन्ही संकटात आहे.