गंभीर गुन्ह्यातील दोन महिला आरोपी लोणीकंद मधून जेरबंद
फुलगाव(गौतम पाटोळे):- खुनाचा प्रयत्न करण्यासह गंभीर गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ७ च्या पथकाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून जेरबंद केले. माधवी राजेश कुंभार (वय २२,रा. कळेपडळ,हडपसर) आणि स्नेहल संजय सोनके (वय २०,रा. तुळजाभवानी नगर,पिंपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ७ कडून तपास सुरू होता. दरम्यान,१५ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना,सदर गुन्ह्यातील दोन महिला आरोपी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरवस्ती परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी स्थानिक बातमीदाराच्या मदतीने परिसरात सापळा रचला. पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मगरवस्ती परिसरात कारवाई करून माधवी कुंभार आणि स्नेहल सोनके या दोघींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते,पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा युनिट ७ संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विनायक साळवे,अमोल ढोणे,भरत उकीर्डे,प्रशांत कापुरे,निलेश साळवे,विकास कदम,गिरीष नाणेकर,सारंग दळे,निर्णय लांडे,किरण पलांडे,सुहास तांबेकर,भरत गुंडवाड,समाधान पाटील तसेच महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर आणि प्रतिक्षा पानसरे यांनी केली.