पिकअप - मोटरसायकल समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील आंधळगाव परिसरातील घटना
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- पिकअप - मोटरसायकल या दोन वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर - चौफुला रस्त्यावरील आंधळगाव परिसरात घडली.
संदीप रोहिदास मदने वय -३२ रा.नागरगाव ता.शिरूर,विक्रम महादेव सकट वय -३२ रा.आंधळगाव ता.शिरूर अशी अपघातातील दोघा मृतांची नावे आहेत.
शिरूर पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, संदीप मदने हा तरुण नागरगाव येथून,विक्रम सकट हा तरुण आंधळगाव येथून एकाच दुचाकीवरून शुक्रवार दि.११ जुलैला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कर्डे येथे खाजगी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. आंधळगाव परिसरातील साळूंखे वस्ती समोरील महामार्गावर शिरूरच्या दिशेने येणा-या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. दोघांच्याही डोक्याला,शरीराला गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही उपचारासाठी शिरूर व पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
शिरूर पोलीसांनी पिकअप चालक दत्तात्रय रामचंद्र कदम वय -३२ रा.रामलिंग ,शिरूर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
.