वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी):-
वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे तसेच कवठे येमाई येथे घडली.तळेगाव ढमढेरे येथील विमल बंडोबा रसाळ यांना घेवून त्यांचा भाचा तळेगाव ढमढेरे -एल अॅण्ड टी फाटा रस्त्यावरून दुचाकीने घराकडे निघाला होता.रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीचे चाक आदळल्याने विमल रसाळ( वय -६८ रा.माळीमळा ) रस्त्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाली.त्यांना तातडीने वाघोली येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दुस-या घटनेत अरणगाव येथील बापू ज्ञानदेव श्रीराम (वय -५३ ) हे आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथून शिरूर तालुक्यातील मलठण येथे दुचाकीवर परतत होते.रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीतील हाॅटेल साम्राज्य समोर दूध टॅंकर चूकीच्या दिशेने येवून दुचाकीवर आदळल्याने दुचाकीस्वार बापू श्रीराम यांचा अपघातात मृत्यू झाला.
आप्पा लक्ष्मण श्रीराम वय -५२ रा.ढोकसांगवी ता.शिरूर यांनी या अपघाताची फिर्याद दिली असे समजले.