गॅस सिलिंडर वाहतूक करणा-या ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
शिरूर:- गॅस सिलिंडर वाहतूक करणा-या ट्रकच्या धडकेत जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शिक्रापूर -चाकण रस्त्यावर पिंपळे जगताप येथे घडली. रखमाबाई साकोरे वय -६० असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून दुचाकी चालक लक्ष्मण मारूती झेंडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनुसार,दुचाकी चालक लक्ष्मण मारूती झेंडे हे रखमाबाई साकोरे यांना रूग्णालयतून पिंपळे जगताप रस्त्यावरून घरी घेवुन जात असताना पाठीमागून आलेल्या गॅस सिलिंडर वाहतूक करणा-या एम एच १२ एच डी ५२१३ या क्रमांकाच्या ट्रकने झेंडे यांच्या एम एच १२ डब्ल्यू टी ८८१० या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रखमाबाई साकोरे रस्त्यावर पडल्या.ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी चालक लक्ष्मण मारूती झेंडे यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगेश जालिंदर साकोरे रा.करंदी यांनी या अपघाताबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी ट्रकचालक मारूती रामचंद्र कापरे वय -४६ रा.वाघाळे ता.शिरूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार संदीप बनकर या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.